Birsa Munda : भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी बिरसा मुंडा (Birsa Munda) यांची 15 नोव्हेंबरला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं देशभर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. जयंती दिनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करुन, त्यांच्या क्रांतिकारक विचाराचे स्मरण करण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबरला देशभर एक लाख गावात किसान सभेच्या वतीनं लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झेंड्याचं ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिली.
 
13 ते 16 डिसेंबर 2022 या काळात त्रिपुर, केरळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या 35 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रचार कार्याची ही सुरुवात असणार आहे. बिरसा मुंडा यांनीच भारताची जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी आणि परकीयांचे आक्रमण व पारतंत्र्य रोखण्यासाठी अभूतपूर्व संघर्ष केला. आज जेव्हा पुन्हा एकदा कॉर्पोरेट कंपन्या, कॉर्पोरेटधार्जिणे भाजप सरकार आदिवासींच्या जगण्याच्या अधिकारांवर आक्रमण करत आहे. राष्ट्राची संपत्ती असलेले जल, जंगल, जमीन ओरबाडत आहे. आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनींवर मालकी नाकारुन त्यांना जंगलातून बेदखल केले जात असल्याचे डॉ. अजित नवले यावेळी म्हणाले. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांचा आदर्श समोर ठेवत पुन्हा संघर्ष करणे अटळ झाले आहे. किसान सभा त्यांचा हा संघर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अजित नवले म्हणाले. 15 नोव्हेंबर रोजी देशभर एक लाख गावांमध्ये ध्वजारोहण करुन ही लढाई मजबूत केली जाणार असल्याचे नवले म्हणाले.


कोण होते बिरसा मुंडा?


बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी 15 नोव्हेंबर, 1875 रोजी झाला होता. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले होते. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळं तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले. बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्या ने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात 1895 साली लढा उभारला होता. इंग्रजांनी त्यांना अटक करुन तुरुंगात त्यांचा अतोनात छळ केला होता. 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.


'उलगुलान' चळवळ


1857 चा उठाव दडपल्यानंतरही भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात ब्रिटिशांविरोधात उठाव सुरु झाले होते. त्यामध्ये 1895 ते 1900 सालाच्या दरम्यान मध्य भारतातील, छोटा नागपुरच्या प्रदेशात बिरसा मुंडा यांनी सुरु केलेली 'उलगुलान' चळवळ ही महत्वाची आहे. देशावर राज्य करणारे इंग्रज आणि आदिवासींचे धर्मांतर करणारे मिशनरी या दोघांच्या विरोधात लढा देण्यात बिरसा मुंडा यांनी आपले जीवन व्यतीत केलं. 


ब्रिटिशांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासींच्या जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळी आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी बिरसा मुंडे पुढे आले. आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उचललं. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी उलगुलान चळवळ सुरु केली. त्या दरम्यान बिरसा मुंडा आणि ब्रिटिशांमध्ये अनेकवेळा चकमकी झाल्या. 


महत्त्वाच्या बातम्या:


Birsa Munda : आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढणारे महान क्रांतीकारक बिरसा मुंडा