शिर्डी : शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना राज्य सरकारनं दिलेल्या घराला पावसाने गळती लागली आहे. सरकारकडून राहीबाईंना गेल्या वर्षी नवीन घर सुपूर्द केलं मात्र यंदाच्या पावसाळ्यात त्या घराला गळती लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


चिंतेची बाब म्हणजे सरकारनं दिलेल्या घराच्या भिंतीला ओल आल्यानं राहीबाईंची आयुष्यभराची जमापुंजी म्हणजेच त्यांनी जतन करून ठेवलेली बियाणं भिजण्याची भीती आहे.  सरकारनं दिलेल्या घराच्या दुरवस्थेची एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.



दरम्यान राहीबाई पोपरे यांना देशी बियाणांचा खजिना सरकारच्या घराऐवजी त्यांच्या जुन्या मातीच्या घरात ठेवणं योग्य वाटू लागलं आहे.

राहीबाईंच्या देशी बियाणांच्या बँकेला सुरक्षित आसरा मिळावा म्हणून एबीपी माझानं बातम्यांच्या स्वरूपात विशेष मोहीम राबवली होती.



एबीपी माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई पोपरेंना नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिलं होतं. मात्र वर्षभरात घराला गळती लागल्यानं निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे. आता घर बांधून देणाऱ्यांवर चंद्रकांत पाटील कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.