Ajit Pawar NCP Minister List : महायुती सरकारचा शपथविधी आज होत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आतापर्यंत दहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. मात्र या यादीमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा नावाचा अजूनही समावेश करण्यात आलेला नाही. अखेरच्या क्षणी धनंजय मुंडे यांच्या नावाववर शिक्कामोर्तब करण्यात आले, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर अजूनही अजित पवारांकडून करण्यात विचार करण्यात आलेला नाही. दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या दोन नावांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.


छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला आहे का?


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांना मंत्रीपदासाठी फोन गेला आहे. मात्र, या यादीमध्ये आता आणखी एका सरप्राईज नावाचा समावेश झाला आहे. अजितदादा पवार गटाकडून माणिकराव कोकाटे यांना सुद्धा मंत्रीपदासाठी फोन गेला आहे. त्यामुळे एक प्रकारे नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने मंत्रीपद जात असल्याने छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्यामुळे बरेच वाद निर्माण झाले होते. मराठा आंदोलनाने पेटले असताना छगन भुजबळ यांच्या भूमिकेने महायुती सरकारमध्ये चांगलीच अडचण निर्माण झाली होती. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाजूला करण्यात आलं आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.  दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनंजय मुंडे यांचा सुद्धा अखेरचा क्षणी यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.  


सिन्नर विधानसभेत पाचव्यांदा आमदार


माणिकराव कोकाटे यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली. 2004 मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती. नंतर नारायण राणे यांच्या सोबत 2009 मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले  2009 साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी भाजकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित दादा यांच्या गटात गेले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 41 हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले. 


अजित पवारांनी पाळला सिन्नरकरांना दिलेला शब्द


दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान सिन्नर येथे आयोजीत प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव ‍कोकाटेंना आमदार करा मी त्यांना मंत्री करतो, मंत्रीमंडळात कोकाटेंना महत्वाची जबाबदारी देण्यात येईल असे आश्वासन सिन्नरकरांना दिले होते. आता अजित पवार यांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या