भिवंडी :  भिवंडी (Bhiwandi News) शहरात एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीचा चुकीचे उपचार केल्यामुळे निधन झाले आहे. चिमुरडीच्या  मृत्यूस डॉक्टर, परिचारिका,रुग्णालय व्यवस्थापक जबाबदार  धरत  संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.  तसेच डॉक्टर परिचारिका यांना मारहाण करण्याची घटना घडली आहे. मुलीच्या मृत्युने  कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथे सनलाईट हॉस्पिटल आहे.  राम नगर परिसरात राहणारे नितीन कांबळे यांची चार वर्षीय मुलगी श्रद्धा हिला उलट्या होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास श्रद्धा हीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाला सलाईनमधून इंजेक्शन देण्यात आले.त्यानंतर श्रद्धा बेशुद्ध पडून निपचित झाली व त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे कळताच रुग्णालयात असलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी तांडव सुरू केला .त्यानंतर तेथे जमा झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर परिचारिकेला मारहाण केली आहे.


या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी  नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली व त्यानंतर श्रद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करत अकस्मात मृत्यूची नोंद केली.  डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे  मुलीचा मृत्यू झाला आहे.  इंजेक्शनचे तीन डोज लागोपाठ दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झालाय अशा आरोप नातेवाईकांनी केलाय तसेच डॉक्टरांवर कायदेशीर कारवाही करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर रुग्णालयात तोडफड प्रकरणी डॉक्टरांनी नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून भोईवाडा पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.