भिवंडी: कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याने भिवंडीतील शासकीय कार्यालयाच्या परिसरात तब्बल दोन तास धुमाकूळ घातल्याची घटना आज घडली. दोन तास या रेड्याने तिथल्या नागरिकांची झोप उडवली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर या रेड्याला पकडण्यात आलं. रेड्याचा हा धुमाकूळ बघताना अनेकांचं करमणूक झाली.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा ईद उल अदा अर्थातच बकरी ईद सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याचवेळी भिवंडी शहरात कुर्बानीसाठी आणलेल्या एका रेड्याने मालकाच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला आणि तो थेट शासकीय कार्यालयाच्या आवारात घुसला. शासकीय कार्यालयाच्या आवारात या रेड्याने चांगलाच धुमाकूळ घातला. तब्बल दोन तास हा रेडा कुणाच्याच हाती लागत नव्हता. अथक प्रयत्नानंतर या पिसाळलेल्या रेड्याला काबूत करण्यात नागरिकांना यश आलं.
भिवंडीत बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बकरे तसेच रेडे कुर्बानीसाठी विकत घेण्यात आले. यामध्ये शहरातील गैबी नगर परिसरातील एका व्यक्तीने एक भला मोठा अजस्त्र वजनाचा रेडा कुर्बानीसाठी आणून आपल्या घराच्या आवारात बांधून ठेवला होता. रविवारी सकाळी या रेड्यास कुर्बानीसाठी घेऊन जात असताना रेडा अचानक पिसाळला आणि त्याने मालकाच्या हातातील दावण तोडून पळ काढला.
सैरावैरा पळस सुटलेल्या या रेड्याने भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या शेजारील पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. या ठिकाणी त्याला पकडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक तसेच पोलीस दाखल झाले. त्या ठिकाणी या रेड्याने तब्बल दोन तास धुमाकूळ घालून या पकडणाऱ्यांची दमझाक केली. अखेर तहसीलदार कार्यालयाजवळील सबजेल शेजारील निमुळत्या जागेत तो रेडा आल्याने त्याला पकडण्यात आले. त्यानंतर या रेड्याला बांधून ठेवण्यात आलं आणि मगच सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला. परंतु तोपर्यंत अनेकांची करमणूक ही झाली हे विशेष.
देशभरात आज ईद-उल-अझा म्हणजेच बकरी ईदचा (Bakra Eid) सण मोठ्या उत्साहात साजरा झाली. या सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून कुर्बानी दिली जाते.