भिवंडी मनपा क्षेत्रात 2011 च्या जनगणनेनुसार 709,665 इतकी लोकसंख्या आहे. शहर व ग्रामीण भागात 200 हुन अधिक सायजिंग व डाईंग कंपन्या आहेत. तसेच शहरात स्थापन झालेल्या या सायजिंग व डाईंग कंपन्यांमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साईड हा विषारी वायू सोडण्यासाठी चिमण्या(धुरांडी)उभारण्यात आल्या आहेत. सरकारी नियमानुसार या चिमण्यांची उंची सर्वसाधारण 90 ते 120 फूट असणे आवश्यक आहे. परंतु, येथील चिमण्यांची उंची फक्त 70 ते 80 फूट किंवा त्याहून कमी उंची असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये कोळसा टाकणे आवश्यक असताना काही डाईंग कंपन्या आर्थिक बचतीसाठी कोळशाऐवजी प्लास्टिक, फायबर, कपड्याच्या चिंध्या, भंगार जाळतात.
याबाबत एका सायजिंग चालकाला विचारणा केली असता भिवंडीत 70 टक्के सायजिंग व डाईंगमध्ये अशाच प्रकारे भंगार जाळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सायजिंग व डाईंगच्या धुरातून काळे तंतू तयार होतात. हे तंतू या परिसरात राहणारी लहान-मोठ्या नागरिकांच्या नाकातोंडात जात असतात. अनेकदा धुरामुळे डोळे झोमने, खोकला, श्वास घ्यायला त्रास, अशा अनेक आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातून वाहत जाणारी कामवारी नदीच्या किनारी अशा अनेक सायजिंग व डाईंगचे जाळे पसरले आहे. त्यामुळे या कारखान्यातून निघणारा रासायनिक द्रव्य थेट नदीत सोडलं जात असल्याने या नदीचं रूपांतर अक्षरशः नाल्यात झालं आहे.
तर दुसरीकडे भिवंडी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. भिवंडीकरांनी या खड्ड्यांमुळे अनेक त्रास सहन करत पाठीचा, मानेचा, दम्याचे आजार आपलेसे केले. मात्र, या खड्ड्याबरोबरच आता खड्ड्यातून निघणाऱ्या धुळामुळेही भिवंडीकर त्रस्त झालेत. घरातून बाहेर निघाल्यावर संपूर्ण रस्ता धुळीने व्यापलेला असतो. एक मिनिटंही श्वास घेऊ शकत नाही अशी परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे. यावर पर्यायी उपाय म्हणून कित्येक नागरिकांनी तोंडावर रुमाल, स्कार्फ किंवा मास लावून फिरतात. परंतु, पालिका प्रशासनाला ही धूळ काही दिसत नाही.
वायूप्रदूषण संदर्भात तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता सायजिंग व डाईंग कंपन्यातुन निघणाऱ्या धुरात प्राणघातक घटक असतात व ते मानव जीवनास हानिकारक आहे. तसेच शहारत खड्ड्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भिवंडीत वायू प्रदूषणाचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. दमा, कर्करोग, श्वसनाचे विकार, पक्षाघात, हृदय बंद पडणे, श्वास घेताना त्रास, डोळ्यात जळजळ होणं, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी तसेच लंग्सची समस्या होऊ शकते. तर यावर उपाय म्हणून या सायजिंग व डाईंग कंपन्या, कारखाने रहिवाशी क्षेत्रातून दूर असाव्यात तसेच नियमांच उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कार्यवाही करणे आवश्यक आहे.
भिवंडीत वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढत असताना विरोधीपक्ष नेता यशवंत टावरे यांनी या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका व प्रदूषण महामंडळाकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र, तक्रारींचे निवारण होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भिवंडीत वायु प्रदूषण दुप्पटीने वाढले आहे. आयक्यूएआर विजुअल एन्ड ग्रीन पीस नावाच्या संस्थेच्या सर्वेनुसार हवेत उडणारे सूक्ष्म कण मोठ्या प्रमाणावर आढळल्याने भिवंडीचा पाचवा क्रमांक लागतो. तर भिवंडी महापालिकेच्या आकड्यानुसार भिवंडीत वायू प्रदूषण 248 पॉईंटपर्यंत पोहचले आहेत. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे.
अनेक डाईंग कंपन्या अनधिकृतपणे थाटल्या असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नेते पुढारी तसेच शासकीय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व ग्रामिण भागात स्थानिक ग्रामपंचायतींना हाताशी धरून फक्त ग्राम पंचायतींच्या ना हरकत दाखल्यावर अनेक डाईंग कंपन्या उभारल्या आहेत. त्यातच डाईंगमालक व शासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधाने या अनधिकृत डाईंग कंपन्यांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्याची बाब देखील समोर येत आहे. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या या डाईंग कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष लागत नाही, हीच मोठी खेदाची बाब आहे.
संबंधित बातम्या :
Delhi Pollution : आम्ही तुम्हाला आत्ता इथेच सस्पेंड करु, पंजाबच्या मुख्य सचिवांना सुप्रीम कोर्टाची तंबी
दिल्लीतल्या प्रदूषणामुळे भारत-बांगलादेश टी20 सामना रद्द होण्याची शक्यता
Air Pollution | वायूप्रदूषणानं अंबरनाथकर हैराण | ABP Majha