बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील आणि उद्धव ठाकरे यांना 'उपद्व्यापी ठाकरे'  म्हणून संबोधणाऱ्या निजद नेते बसवराज होरट्टी यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते.


बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन द्यावे असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. भीमाशंकर पाटीलवर कारवाई झाली नाही तर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णयही घेतला गेला. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनाचे गांभीर्याने पालन करून हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. बैठकीत माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार अरविंद पाटील, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रणजित पाटील आदींनी आपली मते मांडली. प्रकाश मरगाळे, राजू मरवे, राजाभाऊ पाटील, रावजी पाटील, एस.एल.चौगुले, खानापूरचे जगन्नाथ बिर्जे, निपाणीचे जयराम मिरजकर, बी.डी. मोहनगेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक आयुक्तालयात बोलावली होती. या बैठकीत पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी कार्यकर्त्यांना शांतता पाळण्यासाठी नेते मंडळींनी आवाहन करावे. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी बैठकीत सांगितले. त्यावर सीमाभागातील शांतता कोणी बिघडवली? असा सवाल समिती नेत्यांनी केला. आम्ही लोकशाही मार्गाने आजवर आंदोलन करत आलो आहे. सीमाभागात शांतता ज्यांनी बिघडवली त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी समिती नेत्यांनी केली.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी : धैर्यशील माने

बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; शिवसेना, कनसे वाद चिघळण्याची शक्यता