कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे. असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिला आहे. तसेच, या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही धैर्यशील मानेंनी म्हटलं आहे. तसेच या विकृत संघटनेवर बंदीची घालण्याचीही मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुकवर पोस्टही लिहिली आहे.




जालियनवाला बाग हत्याकांडासारख्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे जर कोणी बोलत असेल तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. हे अत्यंत लज्जास्पद वक्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर जर अशी भाषा कोणी करत असेल तर वेळ आणि स्थळ सांगा, असे थेट आव्हान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिलं आहे.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी फेसबुकवर पोस्ट करत थेट कर्नाटक नवनिर्माण सेनेला आव्हान दिलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो" कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ". आजवर महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे. अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.'

पाहा व्हिडीओ : शिवसेना खासदार धैर्यशिल मानेंचा कर्नाटक नवनिर्माण सेनेला इशारा



काय म्हणाले भीमाशंकर पाटील?

चौसष्ट वर्षांपासून सीमाभागातील सरकारी मालमत्तेचे आणि कन्नड जनतेच्या मालमत्तेचे महाराष्ट्र एकीकरण समिती नुकसान करत आहे. कन्नडिग जनतेच्या डोळ्यात कुसळा प्रमाणे टोचत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, त्याला माझा पाठिंबा आहे असे बेदरकार वक्तव्य भीमाशंकर पाटील याने पत्रकार परिषदेत केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद :

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. बेळगाव-कारवार-निपाणी तसेच परिसरातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी आतूर आहे. कर्नाटक राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर कानडी भाषा शिकण्याची सक्ती केली जाते. काही वर्षांपूर्वी बेळगावचे नाव देखील तेथील सरकारने बदलले होते. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कर्नाटक सरकारमध्ये या ना त्या कारणावरुन वाद सुरु असतात.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला : कर्नाटक नवनिर्माण सेना