मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान (मंत्रीपद) न मिळाल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश मिळालं आहे. आज मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत सोळंके यांची चर्चा झाली आणि त्या बैठकीनंतर आपण राजीनामा देणार नसल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले आहे. सोळंके यांचं पक्षाकडून समाधान झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले की, प्रकाश सोळंके पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे सोळंके यांना चर्चा करण्यासाठी पक्षाने मुंबईत पाचारण केलं. आमच्यात योग्य चर्चा झाली आहे. पक्षातील सर्व नेत्यांचा कार्यकर्त्याचा योग्य सन्मान ठेवायला हवा, ही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका आहे. आमच्यात झालेल्या चर्चेनंतर सोळंके यांचं समाधान झालं आहे. त्यामुळे सोळंके पक्षावर नाराज असल्याच्या प्रश्नावर आता पडदा पडला आहे.
प्रकाश सोळंके यांनी प्रसासमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे मला न्याय मिळावा (राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं) ही माझी भूमिका होती. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे माझी पक्षावर नाराजी होती. आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि सक्रीय राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा मी विचार करत होतो. परंतु कार्यकर्त्यांनी मला माझा निर्णय मागे घेण्यास सांगितले.
सोळंके म्हणाले की, आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत मी चर्चा केली, यातून माझं समाधान झालं आहे. माझे आणि शरद पवारांचे बोलणे झाले आहे. पवारांच्या आदेशानुसार मी माझा राजीनामा मागे घेत आहे. मला मंत्रीपद नको, मला केवळ सन्मानाने काम करण्याची संधी द्यावी, ही माझी इच्छा आहे, त्याबद्दल मी पक्षातील नेते आणि शरद पवार यांना सर्व काही सांगितलं आहे.
अजित पवार याबाबत बोलताना म्हणाले की, मंत्रीमंडळात संधी द्यावी, अशी सोळंके यांची इच्छा होती. त्यात काहीही गैर नाही. आम्ही त्यांची समजूत काढून या वर्षाचा शेवट गोड केला आहे.
पाहा जयंत पाटील आणि प्रकाश सोळंके काय म्हणाले?