Father Stan Swamy: भीमा-कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon) आणि शहरी नक्षलवाद (Urban Naxal) प्रकरणी अटकेत असताना मृत्यू झालेले सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांच्या लॅपटॉपमध्ये पुरावे पेरले असल्याचा दावा अमेरिकेतील फॉरेन्सिक लॅबने (Forensic Laboratory) केला आहे. या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. स्वामी यांच्या लॅपटॉपमध्ये जवळपास 44 दस्ताऐवज, फाइल्स हॅकरने अपलोड केला असल्याचे तपासात समोर आले आहे. याआधी, रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या लॅपटॉपमध्येदेखील अशाच पद्धतीने पुरावे पेरले असल्याचा दावा अमेरिकेतील फॉरेन्सिक लॅबने केला होता. त्यामुळे भीमा-कोरेगावच्या प्रकरणाच्या तपासावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


भीमा कोरेगावमध्ये 2018 मध्ये हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारामध्ये आणि त्याआधी झालेल्या एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांचा संबंध असल्याच्या आरोपावरून तपास यंत्रणांनी देशभरात कारवाई केली. यामध्ये आदिवासी समुदायात आणि सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले कार्यकर्ते आणि विचारवंत यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात 84 वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांनादेखील राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक झाली होती. वृद्धपकाळ आणि आजारांमुळे फादर स्टॅन स्वामी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 


फादर स्टेन स्वामी यांच्या वकिलांनी अमेरिकेतील बोस्टनमधील फॉरेन्सिक लॅबकडून याबाबत चाचणी केली. आसर्नेल कन्सल्टिंग फर्मने दिलेल्या माहितीनुसार, फादर स्टेन स्वामी यांच्या लॅपटॉपमध्ये असलेली माओवादी पत्रांसह इतर जवळपास 44 दस्ताऐवज, कागदपत्रे अज्ञात सायबर हॅकरकडून अपलोड करण्यात आली. या हॅकरने स्टेन स्वामी यांच्या कॉम्प्युटरचा अॅक्सेस मिळवला होता. रिपोर्टनुसार, स्वामी यांच्याशी संबंधित ठिकाणी तपास यंत्रणांनी छापा टाकण्याआधी एक आठवडा आधी म्हणजे 5 जून 2019 रोजी हे आक्षेपार्ह दस्ताऐवज, कागदपत्रे अपलोड करण्यात आली होती. या दस्ताऐवजांच्या आधारे स्टेन स्वामी यांना नक्षलवाद्यांच्या संबंधांवरून अटक करण्यात आली होती. फादर स्टेन स्वामी यांच्या वकिलांनी तपास यंत्रणांच्या पुराव्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. 


फादर स्टेन स्वामी कोण होते?


फादर स्टेन स्वामी हे मूळचे तामिळनाडू येथील होते. समाजशास्त्रात एमए केल्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काही काळ काम केले. त्यानंतर झारखंडमध्ये आदिवासींमध्ये त्यांनी कामास सुरुवात केली. सुरुवातीला पाद्री म्हणून असणाऱ्या स्टेन स्वामी यांनी आदिवासींच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला. त्यांनी विस्थापन विरोधी जनविकास आंदोलन ही संघटना स्थापन केली होती. त्यानंतर मानवाधिकारासाठीदेखील संघर्ष सुरू केला. रांचीच्या नामकुम क्षेत्रात आदिवासी मुलांसाठी ते शाळा आणि टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली होती. आदिवासींच्या हक्कासाठी आंदोलन करत असल्याने सरकारकडून त्यांच्या विरोधात विविध गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. यामध्ये राजद्रोहाचाही आरोप होता. 


भीमा कोरेगाव प्रकरण काय?


एका जानेवारी 2018 मध्ये पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये  हिंसाचार झाला होता. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभासाठी अभिवादन करण्यास आलेल्या आंबेडकरी जनतेवर दगडफेक करण्यात आली होती. काहीजणांनी भीमा-कोरेगावमध्ये आलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. हिंसाचारात दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. 


या हिंसाचाराच्या एक दिवस आधी पुण्यातील शनिवारवाड्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मनुवादाविरोधात संघर्ष करणे, जातीय अत्याचाराला विरोध करण्यासह भाजपला कधीही मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली होती. त्या एल्गार परिषदेत आणि झालेल्या हिंसाचारामागे नक्षलवाद्यांचा सहभाग होता, असा आरोप तपास यंत्रणांचा आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: