Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.
बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीचं बोम्मईंना पत्र
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नये, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळं आज अमित शाह यांच्या मध्यस्थीला यश येणार का? सीमावादाबाबत गृहमंत्री नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
9 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली होती गृहमंत्र्यांची भेट
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी 9 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर अमित शाह हे येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर परस्पर समन्वयानं तोडगा काढू असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिली होती.
खसादरांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अमित शाह यांच्याकडे केली होती तक्रार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्यानं वक्तव्य केली जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले होते. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले जात आहेत. तसेच राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यापासून रोखलं जात आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार देशात कुठेही जाण्याचा हक्क आहे. याला अडकाठी केली जात आहे. याबाबतच्या सर्व तक्रारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली होती. त्यानंतर आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबच अमित शाह चर्चा करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: