Bharat Gogawale : बार तर आख्ख्या महाराष्ट्रात आहेत, सगळीकडेच हिडिस-फिडिस..., मनसेच्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर मंत्री गोगावले काय म्हणाले?
Bharat Gogawale On Dance Bar : काही प्रमाणात मनोरंजनाला मान्यता देण्यात आली आहे, पण बिभस्त प्रकारच्या गोष्टींवर राज्य सरकारने बंदी आणली आहे असं भरत गोगावले म्हणाले.

सोलापूर : मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमधील डान्सबारवर केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे मंत्री भरत गोगावलेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बार सगळ्या महाराष्ट्रात आहेत, पण सगळीकडेच हिडिसफिडीस कृत्यं चालत नाहीत असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी चुकीची कामं होतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. ते सोलापुरात माध्यमांशी बोलत होते.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डान्सबार सुरू असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिकांनी पनवेल आणि इतर डान्सबार वर खळ्ळखट्याक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील मंत्री असलेल्या भरत गोगावलेंनी त्यावर वक्तव्य केलं.
भरत गोगावले म्हणाले की, "डान्स बारला मागेच बंदी आली आहे. करमणूक म्हणून काही गोष्टींना परवानगी आहे. मात्र सगळीकडेच हिडिसफिडीस काही दाखवले जात नाही. सगळीकडेच डान्स बार नाहीत, खाणारे पिणारे पण बार आहेत. त्याबाबत काही अडचणी असतील तर शासन नक्कीच सोडवणार."
भाजपा आमदार परिणय फूके यांनी टशिवसेनेचा बाप मी आहेट असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, त्यांनी हे वक्तव्य कुठल्या सेनेबद्दल केलं आहे ते तपासावे लागेल.
बारवर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना जामीन
पनवेलमधल्या नाईट रायडर्स या डान्स बारच्या तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनसे शहर अध्यक्ष योगेश चिले आणि त्यांच्या सात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पनवेल तालुका पोलिसांकडून या आठ मनसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यांना पनवेल न्यायालयानं जामीन मंजुर केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना रायगड जिल्ह्यातल्या डान्स बारच्या संख्येवर भाष्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडमध्ये अनधिकृत डान्सबार एवढ्या मोठ्या संख्येनं कसे काय? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यानंतर मनसैनिकांकडून खळ्ळखट्याक करत नाईट रायडर्स डान्स बारची तोडफोड केली होती. या प्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:























