भंडारा-गोंदिया : निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झालं. पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 31 मे रोजी जाहीर होईल.


या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आल्या होत्या.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार होती, तर नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनी तालुक्यात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.

एकूण दोन हजार 126 मतदान केंद्र होते, तर मतदारांची संख्या 17 लाख 48 हजार 677 एवढी होती. यापैकी 42 टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

LIVE UPDATE


-ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय : खासदार प्रफुल्ल पटेल

-ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्याची मागणी समोर येत आहे : खासदार प्रफुल्ल पटेल

-ईव्हीएममधील बिघाडांच्या तक्रारीबाबत गांभीर्याने विचार व्हावा : खासदार प्रफुल्ल पटेल

-गोंदियात 35 मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया रद्द झाल्याची बातमी खोटी, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची माहिती

- मतदान यंत्रं दुरुस्त किंवा बदलून दिल्याने मतदान सुरु, शेवटच्या मतदाराला मतदान करेपर्यंत केंद्र बंद करण्यात येणार नाही

-भंडारा-गोंदियातील 35 मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया रद्द, मतदान यंत्रातील बिघाडामुळे निर्णय

-भंडारा-गोंदियात 450 ईव्हीएम बंद, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपकडून जाणूनबुजून ईव्हीएम बंद पाडण्याचा प्रकार, फेरमतदान घेण्याची आंबेडकर यांची मागणी

-सकाळी 11 वाजेपर्यंत 13.90 टक्के मतदानाची नोंद

-सकाळी 9 वाजेपर्यंत सहा टक्के मतदानाची नोंद

-भंडारा : लाल बहादूर शास्त्री शाळेत ईव्हीएम बंद पडल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गोंधळ

-भंडारा : तुमसर तालुक्यातील खरबी, हिंगणा, मांढळ आणि खापा मध्ये 11 ईव्हीएम मशिन्स बंद पडले

रिंगणातील उमेदवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.

भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी केली असली, तरी ही जागा काँग्रेसला जाईल आणि नाना पटोले उभे राहतील, अशी धारणा होती. मात्र राष्ट्रवादीने जागा सोडली नाही आणि प्रफुल्ल पटेल स्वतःही उभे राहिले नाहीत. मात्र दोघांनी अत्यंत जुनं वैर मिटवलं. दोघांनीही राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांच्यासाठी प्रचार केला.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे येऊन गेले, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर जोर लावला आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्र असून त्यापैकी सहा भाजप, तर एक काँग्रेसकडे आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास

तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना जवळपास दीड लाख मतांनी हरवलं होतं. तिसऱ्या स्थानावर बसप होतं.

पालघर पोटनिवडणूक

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित भाजपतर्फे मैदानात उतरले आहेत. शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. यावरुन सेना-भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच झाली.

काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.