मुंबई : पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे.


व्हीव्हीपॅट मशीन सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल.

पालघरमध्ये प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजपचा संघर्ष पेटला होता, जो अजूनही धगधगतोय. शिवसेनेच्या नेत्यांनी काही लोकांना पैसे वाटताना पकडलं आणि भाजपवर पैशांचा पाडल्याचा आरोप केला.

शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपनेही वादात आगीचं काम केलं.

भंडारा-गोंदियातही मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये आहे.

पालघर पोटनिवडणूक

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.

शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले हे मैदानात आहेत.

संबंधित बातम्या :

ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार : मुख्यमंत्री


मुख्यमंत्रीसाहेब, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ समजावून सांगा : उद्धव ठाकरे