पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील 7 उमेदवारांचे भवितव्य मतदान मतपेटीत बंदिस्त झाले.  सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 46.50 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान मशिनमध्ये तांत्रिक बिघाड वगळता जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.

या मतदारसंघात 17 लाख 31 हजार 77 मतदार आहेत. यापैकी 9 लाख 7 हजार 400 पुरुष तर 8 लाख 23 हजार 592 स्त्री, इतर 85 मतदार आहेत.

22 अ. ज. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच VVPAT मशिनचा वापर करण्यात आला. मतदानास प्रारंभ झाल्यानंतर या मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या संबंधित ठिकाणी तात्काळ नवीन मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु करण्यात आली होती.

15 टक्के मशिन राखीव असल्याने तांत्रिक समस्या निर्माण झालेल्या ठिकाणी तात्काळ मशिन अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सदर समस्येचे निराकरण करण्यात आल्याची माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.

पालघर जिल्हयामध्ये दिवसभरात अंदाजे 276 VVPAT मशिन तांत्रिक कारणास्तव बदलावे लागले तर CU-14 व BU-12 बदलण्यात आले.

पालघर जिल्हयात एकूण 2097 मतदान केंद्र हेाते तर जिल्हयासाठी 2608 VVPAT मशिन देण्यात आल्या होत्या.  तर 2480 CU  BU उपलब्ध करुन देण्यात आले होते.  अशी माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.

शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

दरम्यान, 31 मे रोजी सकाळी 8 वाजता सूर्या कॉलनी येथे मतमोजणी होणार आहे.

LIVE UPDATE


4.15 PM - कोणत्याही प्रकारच फेरनिवडणुकीची शक्यता नाही. कारण आम्ही प्रत्येक मतदाराला आश्वस्त केलं आहे, त्याला मतदानाचा हक्क बजावता येईल.
त्यामुळे फेरनिवडणूक होणार नाही - शिरीष मोहोड , उप मुख्य निवडणूक अधिकारी

1.44 PM

प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर

  • प्रत्येक मतदारसंघात 15 टक्के मशीन रिजर्व्ह ठेवण्यात आले होते

  • 96 इंजिनियर्सची केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत

  • 15 इंजिनियर्स प्रत्यके मतदारसंघात तैनात आहेत

  • आज आलेल्या अडचणी 10 टक्क्यांच्या आत आहे

  • मतदानाची वेळ वाढवण्यासाठी प्रत्येक प्रीसायडिंग ऑफिसर्सना वेळ कळवायाला सांगितली आहे.

  • संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत जेवढे मतदार रांगेत असतील त्यांना वेळ संपल्यानंतरही मतदान करता येईल

  • कोणालाही मतदानापासून वंचित राहू देणार नाही


12.37 PM #पालघर पोटनिवडणूक- - वसई निर्मळ येथील माळी आळी, मावंडा, नवाले, नंदनवन या चार गावांचा मतदानावर बहिष्कार,
- स्थानिक समस्यांनी त्रस्त नागरिक सर्वच राजकीय पक्षांवर नाराज, दीड हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार

12.15 PM पालघरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १०.२७ टक्के मतदान

12.00 PM पालघर पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनचा उडला फज्जा, 5 तासांनंतरही काही ठीकाणी एव्हीएम मशिन बंद

11.55 AM वसई-विरारमध्ये जव़ळपास १० ते १५ मशिन्स बंद, तर डहाणूमध्ये ४ विक्रमगड ७, बोईसर ३ आणि पालघरमध्ये ५ मशिन्स बंद

10.58 AM तारापूर,शेलवाली, कमारे ,सातपाटी ,मायखोप ,धुकटण ,चिंचणसह अनेक मतदान केंद्रावरील EVM बंद पडल्याने मतदार ताटकळत.


10. 15 AM - सकाळी नऊवाजेपर्यंत पालघरमध्ये 7 टक्के मतदान


10.10 AM विरार पश्चिमेकडील विद्याविहार शाळेतील EVM गेल्या दीड तासापासून बंद, मतदार त्रस्त


9.30 AM - भाजप नेते राजन नाईक यांच्या कार्यलयातून फोन, मतदारांना प्रलोभन दाखवलं जात असल्याचा आरोप


8. 40 AM दिवंगत खासदार चिंतामण वनगा कुटुंबीयांनी पालघरमध्ये मतदानाचा हक्क बजावला


8.32 AM मनवेल पाडा शाळा 107, 117 बूथ 20 मिनिट उशिरा मतदान सुरु


8.23 AM  बूथ नंबर 13 कोपरी नालासोपारा - दोन मशीन बंद



..म्हणून पालघरमधील मतदारांच्या मधल्या बोटाला शाई!

8.23 AM - पालघरमध्ये चार ठिकाणी ईव्हीएम बंद


8.07 AM- भाजप रडीचा डाव खेळतंय, त्यांनी नालासोपाऱ्यात काल पेट्रोल 1 रुपयाने स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर


8.05 AM #पालघर- ज्या भागात आमचं वर्चस्व, तिथेच EVM बंद कसे? बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा सवाल, भाजप साम-दाम-दंड-भेदचा वापर करत असल्याचा आरोप


8.01 AM जिल्हा परिषद शाळा, सायवन, येथील एक EVM मशीन बंद झाल्याने मतदान अर्धा तास उशिरा सुरु. बहुजन विकास आघाडीच्या  उमेदवारानेअर्धा तास वेळ वाढवून मागितला.




7.51 AM बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर कुटुंबासह मतदानाला पोहोचले!



7.12 AM   मतदान केंद्रावर लाईट गेली, अंधारात मतदान सुरु





7.00 AM पालघर पोटनिवडणूक मतदानाला सुरुवात





6.45 AM पालघर पोटनिवडणूक थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार, मतदार पोहोचले मतदान केंद्रावर!





EVM आणि VVPAT

या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होणार आहे. यासाठी  मुंबई, ठाणे, पुणे ,औरगांबाद येथून EVM, तर बडोदा आणि सुरत येथून VVPAT मशीन आणण्यात आली आहेत.  

पालघर पोटनिवडणुकीत मतदारांना मतदान केल्यावर स्लिप दिसते! आपण ज्याला मतदान केलं ,त्यालाच मत गेल्याची खात्री या स्लीपमधून मिळत असल्याचे मतदारांचा अनुभव!

पालघर मतदार संघ

पालघर लोकसभा मतदार संघात एकूण 17 लाख  31 हजार 77 मतदार असून,  9 लाख 7 हजार 400 पुरुष, 8 लाख 23 हजार 592 महिला मतदार आणि 85 इतर मतदार आहेत.

पालघर लोकसभा मतदार संघात 2097 मतदार केंद्र आहेत. त्यापैक्की 14 मतदार संघ संवेदनशील आहेत. जवळपास 12 हजार कर्मचारी आणि 5 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय 900 हून अधिक जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 13 केसेस तसेच 4500 बॅनर काढण्यात आले आहेत.

पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगड मध्ये 328, पालघर मध्ये 318, बोईसर मध्ये 338, नालासोपारा मध्ये 449 तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत.

यापैकी डहाणूमधील पतीलपाडा(63), बोईसरमधील बोईसर(34), धोंडीपूजा (85), खैरपडा (294) तसेच वळीव मधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. 

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिकरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार 117 होमगार्ड आणि 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक यांना तैनात करण्यात आले  आहेत.

मतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, सात हजार 737 मतदान अधिकारी आणि दोन हजार 308 शिपाई यांचा फौज फाटा कार्यरत राहणार आहे.

सर्व मतदारांना  2097 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)  यांचेमार्फत  मतदार चिठ्ठयांचे ( Voter Slip) वाटप करण्यात  येत आहे.  मतदान झाल्यानंतर  EVM आणि VVPAT  मशिन  संबधित  विधानसभा मतदार संघ मुख्यालयाच्या  स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येतील, त्यांनतर  कडक पोलिस  बंदोबस्तामध्ये  या मशिन  पालघर येथील सूर्या कॉलनीमधील  जिल्हा स्ट्राँग रुममध्ये  जमा करण्यात येतील.

31 मे रोजी निकाल

31 मे रोजी पालघर येथे होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झरवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत राहतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ नारनवरे यांनी  दिली.

मतदान सोमवार दि २८ मे रोजी  दिवशी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत तर मतमोजीणी  दि. 31/5/2018  रोजी सकाळी 8.00 वाजता सुरु होणार आहे.