भंडारा : मध्यप्रदेशातून क्षमतेपेक्षा अधिक रेती भरून येणाऱ्या 13 टीप्पर ट्रकचालकांविरूद्ध कारवाई करून हे ट्रक जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या टीप्पर आणि वाळूचा साठा असा अंदाजे अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आरटीओ, सिहोरा पोलीस(Bhandara Crime) आणि तहसील कार्यालय विभागाच्या वतीने संयुक्तीकरिता सिंदपुरी येथे करण्यात आली. राज्याच्या सीमेवरून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या विरोधात पोलिसांनी (Bhandara Police) कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एकाच दिवसात केलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या रेतीची वाहतूक करण्याऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे.
अडीच कोटींचा मुद्देमाल केला जप्त
पूर्व विदर्भासह लगतच्या राज्यात रेतीचे मोठ्या प्रमाणात घाट आहेत. अलीकडे शहरांमध्ये सुरू असलेल्या बांधकामासाठी रेतीची मोठ्याप्रमाणात मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता अवैधरित्या आणि छुप्या पद्धतीने रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. अशातच क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे मध्य प्रदेशातील ट्रक सिहोरा परिसरातून भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाने नागपूर, अमरावती शहरात रेतीची वाहतूक करत असतात. यात मध्यप्रदेशातील तस्कर राजरोसपणे रेतीची वाहतूक करतात.
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याची सीमा बावनथडी नदीपात्रामुळे विभागली आहे. अर्धे-अर्धे पात्र दोन्ही राज्याच्या वाट्याला आले आहे. मध्यप्रदेशातील रेतीचे ओव्हरलोड ट्रक बपेरा आंतरराज्यीय सीमेतून महाराष्ट्रात रॉयल्टीविना जातात. अशा ट्रकच्या मागावर असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली. आरटीओ, महसूल आणि पोलीस विभागाकडून अचानक झालेल्या कारवाईमुळे रेती माफियांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर मार्च महिन्यात खात्याने वर्षभर केलेल्या कारवाईचा तपशील मुख्यालयाला द्यावा लागतो. त्यातूनच जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आल्याची देखील चर्चा तालुक्यात रंगली आहे.
दोन अस्वलांच्या शिकार प्रकरणी चौघांना अटक
वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या वीज प्रवाहित तारांमध्ये अडकून दोन अस्वलांचा शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रामपूरी सहवन क्षेत्र येथे घडली आहे. या प्रकरणी लाखनी वनाधिकाऱ्यांनी चौघांना अटक केली आहे. या चौघांना लाखनी इथल्या न्यायालयात हजर केलं असता, चौघांनाही पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. अश्विन दाजीबा देशमुख (38), मंगेश मानिक चचाणे (35) रुपंचद दयाराम शेंडे (32), रमेश नामदेव रोहणकर (48) (राहणार सर्व नान्होरी ता.लाखनी) अशी या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या