Bhandara News भंडारा : भंडारा (Bhandara) शहरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या दोन सख्ख्या भावांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई (Bhandara Police) करण्यात आली. फैजान साकीर शेख (22) आणि साहिल साकीर शेख (21) (दोन्ही रा. बाबा मस्तानशहा वॉर्ड भंडारा) असं कारवाई केलेल्या या दोघा भावांची नावं आहेत. भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून  या दोन भावांची वर्धा आणि नागपूर (Nagpur) कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.  


दोन्ही भावांवर विविध गंभीर गुन्हे 


गेल्या काही काळापासून भंडार शहरात दहशत माजवणाऱ्या फैजान शेख आणि साहिल शेख यांची दहशत निर्माण झाली होती. दरम्यान, या दोघांवर 2021 पासून भंडारा इथं खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, हत्यार बाळगणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, खंडणी अशा प्रकारचे प्रत्येकी पाच-पाच गुन्हे दाखल आहेत. सामाजिक विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींची भंडारा पोलिसांनी शोध मोहीम राबविली आहे. त्यात या दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. त्यांच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण झाला होता. परिणामी, शहरात सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येण्याचे तसेच दहशत निर्माण झाली असल्याचे दिसून आले. अशा समाजविघातक व्यक्तींवर अंकुश बसविण्याच्या उद्देशाने भंडारा पोलिसांनी या दोन भावांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली.


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारागृहात रवानगी


पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात दोघांवरही एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करून दोघांपैकी एकाची जिल्हा कारागृह वर्धा तर दुसऱ्याची मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली. या कारवाईने आता गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींचे चांगलेच धाबे दणाणले आहे. या दोन भावांसह आता जिल्ह्यातील अन्य धोकादायक व्यक्तींचे गुन्हे अभिलेख तपासून एमपीडीए अंतर्गत कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


ही कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, भंडारा ठाण्याचे पोलीस गोकुळ सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक अनंता गारमोडे, राजेश पंचबुद्धे, अंकुश पुराम, बाळा वरकडे आदींनी कारवाई केली.


इतर महत्वाच्या बातम्या