Maharashtra Governor : राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांचा कोणत्याही क्षणी केंद्राकडून राजीनामा घेतला जाऊ शकतो, त्यामुळे आता महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पुन्हा उत्तराखंडला जायचं आहे असा मानस व्यक्त केला. त्यानंतर आता कोणत्याही क्षणी महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नवे राज्यपाल येणार असून यासाठी तीन नावांची चर्चा आहे. लवकरच नावाची घोषणा करण्यात येणार आहे. पाहूयात कोणत्या तीन नावांची चर्चा आहे....
सुमित्रा महाजन -
इंदूर नगरपालिकेत वरिष्ठ नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास सुमित्रा महाजन यांचा आहे. राजकीय करिअरच्या सरतेशेवटी त्यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये 12 एप्रिल 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. लोकसभेत सलग आठ वेळा इंदुरचं प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे.
ओम माथुर -
1) राजस्थानमधील रहिवासी आणि माजी खासदार.
2) राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
3) सध्या छत्तीसगढचे प्रभारी म्हणून जबाबदारी.
अमरिंदर सिंह
1) अमरिंदर सिंह हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत.
2) 2014 साली पंजाबमध्ये बडे काँग्रेस नेते निवडणूक लढणे टाळत असताना सिंह यांनी अरुण जेटली यांच्या विरोधात निवडणूक लढली होती आणि जिंकली देखील होती.
३) 2017 साली सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढली होती यात 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवला होता.
४) 2019 मध्ये मोदी लाट असताना देखील पंजाबमध्ये फारसा फरक पडला नव्हता. 13 जागांपैकी 8 जागी काँग्रेस विजयी ठरली होती.
मागील काही दिवसांत विरोधकांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर राज्यपाल हटावचा नारा दिला होता. मात्र सत्ताधारी गटाचा वाढता विरोध झुगारून कोश्यारी यांनांच पदावर कायम ठेवलं होतं. पण आता विरोध मावळला असताना राज्यपालानी राजीनाम्याची इच्छा थेट पंतप्रधानांकडे व्यक्त केली आणि पुन्हा राज्यपाल बदलांच्या चर्चांना तोंड फुटल्याचं पाहिला मिळालं. एकिकडे राज्यात राज्यपाल बदलाचे वारे पुन्हा वाहू लागल्यानंतर आता दुसरीकडे भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस देखील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज्यपाल बदलाचा संदेश राज्यात केव्हा येऊन धडकतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.