बेळगाव: एकीकडे गेल्या 65 वर्षापासून बेळगावातील मराठी भाषिक (Maharashtra-Karnataka Dispute) महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत असताना, त्यांना महाराष्ट्रातून हवा तेवढा राजकीय पाठिंबा मिळत नसल्याचं वास्तव आहे. पाठिंब्याचं राहू दे, पण महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता किमान मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नये अशा प्रतिक्रिया आता सीमाभागातून व्यक्त केल्या जात आहेत. त्याला कारण म्हणजे लातूरचे आमदार धीरज देशमुखांचा (Dhiraj Deshmukh) नारा. बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला गेल्यानंतर, भाषण संपल्यानंतर धीरज देशमुखांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला. 


Dhiraj Deshmukh In Belgaum : नेमकं काय घडलं? 


बेळगाव जिल्ह्यातील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मराठी नेते म्हणून शिवरायांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख आणि कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांना बोलावण्यात आलं होतं. 


कार्यक्रमाच्या निमित्ताने या मान्यवरांची भाषणंही झाली. त्यामध्ये आमदार धीरज देशमुखांनी 'जय हिंद जय महाराष्ट्र' म्हणून त्यांचं भाषण संपवलं. पण आपण बेळगावमध्ये असल्याचं समजताच धीरज देशमुख परत माईकजवळ आले आणि त्यांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला. 


आमदार धीरज देशमुखांच्या या कृत्यामुळे मात्र बेळगावातीच नव्हे तर समस्त सीमाभागातील मराठी भाषिक वर्ग नाराज झाला आहे. धीरज देशमुखांनी जय कर्नाटकचा नारा देऊन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 


Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे यांची दिलगीरी


दोन दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे त्यांच्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने निपाणीमध्ये गेले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला. आपली चूक लक्षात आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलगीरी व्यक्त केली. 


Maharashtra Karnataka Border Dispute: पाठिंबा राहू द्या... किमान जखमेवर मीठ चोळू नका


कर्नाटकची निर्मिती झाल्यानंतर तब्बल 865 मराठी भाषिक गावं कर्नाटकमध्ये डांबण्यात आली. ही गावं महाराष्ट्रात सामील व्हावीत यासाठी गेल्या 65 वर्षांपासून बेळगाव, कारवार परिसरातील मराठी भाषकांनी लढा सुरू ठेवला आहे. त्यासाठी त्यांना कित्येकवेळा कानडी पोलिसांचा अत्याचार सहन करावा लागला आहे. ब्रिटिशांनी केला नसेल एवढा अत्याचार त्यांच्यावर केला जात आहे. असं असतानाही मोठ्या हिमतीने या परिसरातील मराठी बांधवांनी हा लढा कायम ठेवला आहे. 


बेळगावातील मराठी भाषकांच्या लढ्याला, खासकरून अलिकडच्या काही काळापासून महाराष्ट्रातून हवा तेवढा पाठिंबा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण बेळगावातील मराठी बांधवांनी हा लढा स्वतःच्या हिमतीवर सुरू ठेवला आहे. अशा वेळी पाठिंबा राहू दे, किमान बेळगावात येऊन आमच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका असं आवाहन करण्यात येतंय.


बेळगावातील हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी किंवा कुणाचीतरी राजकीय दुकानदारी सुरू राहावी यासाठी नाही. हा लढा इथल्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. माय मराठीसाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी आतापर्यंत 107 हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी कोणतंही भाष्य करताना त्याचं भान ठेवावं अशी अपेक्षा या लोकांनी केली तर त्याच चुकीचं काय आहे. 


ही बातमी वाचा: