Jalgaon News Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झालाय. जळगाव जिल्ह्यातील धरणगावात देखील विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. याचदरम्यान झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे.  
 
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं काल आणि आज हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह ग्रामीण भागात रविवारी अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. यावेळी गारखेडा रोडवरील एका शेतात वीज कोसळून नारळाचे झाड पेटले. या आगीत झाड पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवाने घटनास्थळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


धरणगाव येथील राजेंद्र पाटील यांचे सोनवद रोडवरील मोठ्या पाटचारीजवळ शेत आहे. या शेतात काही नारळाची झाडे आहेत. यातील एका झाडावर रिमझिम पाऊस सुरु असताना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वीज पडली. त्यामुळे झाडाने भर पावसात पेट घेतला. यात आजू-बाजूच्या झाडांचे देखील नुकसान झाले आहे.  


वातावरणात अचानक बदल 


गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हामुळे उन्हाचे चटके बसत होते. वातावरणाचा पारा वाढवून अचानक उकाड्याचा त्रास वाढला होता. मात्र आज अचानक वातावरणात बदल झाला असून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. यात जळगाव जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये पावसाने सुद्धा हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशाच पद्धतीचे वातावरण राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 


अनेक पिकांवर रोग पडण्याची शक्यता 


दरम्यान, या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू, हरभरा तसेच इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसामुळं काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता असून पिकांवर रोग पडण्याची शक्यता देखील आहे.  


राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता 


दरम्यान, पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7  मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. शिवाय आज देखील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.