बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावातील बँकेवर दरोडा घालून चोरट्यांनी अंदाजे साडे चार कोटीची रोख रक्कम आणि दीड कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुरगोड शाखेवर दरोडा घालण्यात आल्याची घटना रविवारी (6 मार्च) उघडकीस आली आहे. 


शनिवारी (5 मार्च) बँकेचे कामकाज संपल्यावर कर्मचारी बँक बंद करुन नेहमीप्रमाणे गेले. रविवारी सकाळी साफसफाई करणारा कर्मचारी बँकेत आला असता त्याला बँकेचा दरवाजा तोडण्यात आल्याचे समजले. लगेच त्याने ही बाब बँक कर्मचाऱ्यांना कळवली. बँकेचे कर्मचारी दाखल झाल्यावर त्यांना चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समजले. लगेच पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तिथे दाखल होऊन पाहणी केली असता बँकेतील लॉकर उघडून त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याचे समजले. चोरट्यांनी आपला कार्यभाग साधल्यावर पुन्हा लॉकरचा दरवाजा बंद केला होता.


बीडीसीसी बँकच्या मुरागोडा शाखेचे व्यवस्थापक प्रमोद यालीगर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अंदाजे सहा कोटी रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याचं प्रमोद यालीगर यांनी सांगितलं. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरही चोरीला गेल्याचं व्यवस्थापक यालीगर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसापासून बँकेने कर्ज वसुली मोहीम राबवली असल्याने आणि पुन्हा कर्ज वितरण करायचे असल्याने मोठी रक्कम बँकेत ठेवण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे दरोड्याच्या वेळी चोरट्याने स्ट्राँग रुम न तोडता चावीने उघडल्याचं समजतं. शटर, स्ट्राँग रुम आणि लॉकर उघडण्यासाठी डुप्लिकेट चावीचा वापर केल्याचं कळतं. दरोड्याच्या वेळी चोरट्यांनी मागे कोणताही मागमूस ठेवलेला नाही. त्यामुळे पोलिसांना या दरोड्याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान समोर ठाकले आहे. 


बँक दरोड्याचा गुन्हा मुर गोड पोलीस स्थानकात दाखल झाला असून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सराईत चोरांनी हा दरोडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.