Beed News Update : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाला मदत केली. 


बीडवरून परळीकडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तत्काळ थांबवून अपघातग्रस्त तरुणाला मदत केली.    


धनंजय मुंडे यांनी त्या अपघातग्रस्त तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली. यावेळी आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी (ता. परळी) येथील असल्याचे सांगितले. या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. ते पाहून धनंजय मुंडे यांनी तत्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्याच्या सूचना दिल्या. फोन केल्यानंतर रूग्णवाहिका देखील अगदी दोनच मिनिटात घटनास्थळी पोहोचली. 


धनंजय मुंडे यांनी या तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय दाखल करण्यास सांगितले. शिवाय रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या. 


तरुणाला अंबाजोगाईकडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघातग्रस्त तरूणाच्या कुटुंबाला मिळाली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली. त्यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. "ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय, रुग्णालयात देखील मी बोललो आहे, असे सांगत त्यांना धीर दिला आणि कुटुंबीयांना देखील अंबाजोगाईला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली. अपघातग्रस्त तरूण रूग्णालयात पोहोचल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी फोनवरून त्याची विचारपूस केली आणि डॉक्टरांना लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. 


महत्वाच्या बातम्या


राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात? : धनंजय मुंडे


Dhananjay Munde यांच्या तक्रारीनंतर रेणू शर्मा यांना अटक, खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाई