Ajit pawar : लोकांच्या मनात जे विष कालवत आहेत त्यांनी एखादी संस्था, एखादा कारखाना उभा केला आहे का? असा प्रश्न विचारत, संसार उभा करण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस  घालण्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.


अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवसृष्टीचे नाशिकमधील येवला शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्श केले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.  


गेल्या दोन तीन सभांमधून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना जातीयवादी म्हटलं होत. शिवाय शरद पवार कधी शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत असा, आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या या टिकेला अजित पवार यांनी आज उत्तर दिले. शरद पवार फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत तर त्यांच्या विचारांवर चालण्याचं काम करतात.  आमच्या रक्तात आणि नसानसात शिवाजी महाराज आहेत. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपलं दुकान चालवणाऱ्यांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत. यांचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवारांचं काम आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. 


उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी भोंगे बंद केल्याचे राज ठाकरे सतत सांगतात. परंतु, तेथे फक्त मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मंदिरांवरील लाऊडस्पीकर देखील बंद करण्यात आले आहेत. मराराष्ट्रात मंदिरांवरील लाऊडस्पीकर बंद केले तर चालणार आहे का? असा प्रश्न विचारत वाढणाऱ्या इंधनाच्या किंमतींवर राज ठाकरे एक शब्द देखील काढत नाहीत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.  


अजित पवार म्हणाले, आम्ही कायम दुपारी सभा घेत असतो. यांनी कधी दुपारी सभा घेतली का? कधी कष्ट घेतले आहेत का, उगीच लोकांची दिशाभूल करायची. हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. राजकीय स्वार्थापोटी समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत. बोलताना थोडं भान ठेवायचं असतं. चांगलं वातावरण गढूळ करण्याचं काम काही लोकांकडून केलं जात आहे. अशा वादातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही."


महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भाषणावरुन काय कारवाई होऊ शकते? घटनातज्ञ उल्हास बापट सांगतात...


ईदनिमित्त मनसेकडून महाआरतीचे कार्यक्रम रद्द, ट्विटरवरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन