Devendra Fadnasvis In Satara On Sugar Mill : राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) गंभीर आरोप केले आहेत. साखर कारखाने जगले तरच सहकार जगेल. मात्र राष्ट्रवादी सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. हळूहळू सगळे कारखाने आपल्या दावणीला बांधण्यासाठी प्रयत्न राष्ट्रवादीकडून होतोय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. साताऱ्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यात येणार होते. त्यांचा दौरा रद्द झाला. त्यांनी आपली प्रतिक्रीया एका व्हिडीओद्वारे व्यक्त केली आहे. 
 
साखर कारखान्यावरील ताण संपवायचा असेल तर बँकेने मदत केली पाहिजे 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीची काही मंडळी खाजगीकरणातून कारखाने आपल्या हातात घेतात. साखर कारखान्यावरील ताण संपवायचा असेल तर बँकेने मदत केली पाहिजे आणि सरकारने गॅरंटी दिली पाहिजे. जाणीवपूर्वक किसनवीर सहकारी साखर कारखाना अडचणीत आणून तो आपल्या ताब्यात घ्यायचा या उद्देशाने त्यांना गॅरंटी नाकारली, असा आरोपही त्यांनी केला. 


मुख्यमंत्री असताना मी कधीही पक्ष पाहिला नाही


फडणवीस यांनी म्हटलं आहे की, यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती असलेल्या सत्तारुढ पक्षाच्या कारखान्यांना 500-500 कोटी रुपये कर्ज दिले. मदन भोसले हे भाजपमध्ये आल्यामुळे हा कारखाना विकत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.  मुख्यमंत्री असताना मी कधीही पक्ष पाहिला नाही. सहकारामध्ये हे कारखाने जगले तरच सहकार जगेल. मात्र राष्ट्रवादी सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. हळूहळू सगळे कारखाने आपल्या दावणीला बांधण्यासाठीचे प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 


सहकार क्षेत्राचे कुणालाही देणेघेणे नाही
फडणवीसांनी म्हटलं आहे की, उसावर पक्षाचे शिक्के, कारखान्यावरही पक्षाचे शिक्के आहेत. सहकार क्षेत्राचे कुणालाही देणेघेणे नाही. शेतकऱ्यांचे सर्व कारखाने हे आपल्या घशात घालण्याचा हा कट उधळून लावला पाहिजे. येत्या सहा महिण्यात किसनवीर सहकारी साखर कारखाना हा 25 टक्के किंमतीत कुणाच्यातरी घशात जाईल. राज्यातील अनेक साखर कारखाने हे एनसीडीसीच्या सहकारातून चालले आहेत. सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी कारखाना, प्रतापगड कारखाना आणि खंडाळा कारखाना यांना एनसीडीसीच्या माध्यमातून मदत देऊन तो सुरळीत करण्याचासाठीचा प्रस्ताव अमित शाह यांनी मंजूर केला आहे. वारणा साखर कारखान्याला एनसीडीसीच्या माध्यमातूनच मदत केल्यावर विनय कोरे यांच्या माध्यमातून तो सुरळीत सुरु आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.