Beed: राज्यात विधानसभा निवडणूका (Vidhansabha election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे कुठला नेता कोणत्या पक्षात प्रवेश करतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असताना आज बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव या नेत्याने १०० गाड्यांच्या ताफ्यासह परळी ते बीड रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय.
१०० गाड्यांचा ताफा, वाजत गाजत पक्षप्रवेश
माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस आणि त्या नंतर बीआरएस पक्षांमध्ये काम केले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.. परळी ते बीड अशी एक रॅली काढून जवळपास 100 गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेशसोहळा
परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये बीडमध्ये प्रवेश केला असून टेम्पो, कार, जीप अशा १०० गाड्यांसह ढोलताशांच्या गजरात त्यांनी हा प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. परळीपासून बीडपर्यंत या गाड्यांच्या ताफ्यात रॅली काढण्यात आली असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.
परळी विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी दहशत संपवून परळीचा विकास करायचा असून आज राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे नेते माधव जाधव यांनी सांगितले. यापूर्वी लोकसभा निवडणूकीत बजरंग बाप्पा सोनावणे यांचा प्रचार केल्याचे ते म्हणाले.
लोकसभेतील विजय घटक पक्षांच्या मेहनतीमुळेच
बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या सोपा नाही. इथले प्रश्न दिल्लीत बसून सोडवायची गरज होती. बीडचा प्रश्न सोडवायचा असेल तर अतिरिक्त पाणी आणावं लागेल असं म्हणत लोकसभेतील विजय घटक पक्षातील मेहनतीमुळेच झाला असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
हेही वाचा: