बीड: विरोधी पक्षनेते असताना फक्त प्रश्न विचारायला शिकलात का? कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं का मंत्री महोदय होऊन आपल्याला उत्तर द्यावे लागेल, मंत्र्याला उत्तर द्यावे लागते? असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतला. त्या आंबेजोगाई शहरांमध्ये आयोजित नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभावेळी बोलत होत्या


भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, "पालकमंत्री तुम्ही आहात. तुमच्यावर आरोप करायचं नाही तर कुणावर आरोप करायचा? मग तुम्ही स्पष्ट सांगून टाका मला काही अधिकार नाही, मी नामधारी मंत्री आहे. माझ्या आयुष्यात मी काही करू शकणार नाही असं सांगा. पुढची तीन वर्षं मी एकही प्रश्न विचारणार नाही. पालकमंत्री तुम्ही आहात तर जिल्ह्यातील प्रश्न तुम्हालाच विचारणार. आम्ही आणलेल्या रस्त्याचे श्रेय घेण्यापेक्षा स्वत: रस्ते आणा आणि विकास करा. सभागृहात जसं प्रश्नाचं उत्तर देतात तसं जनतेच्या सभागृहात देखील उत्तर द्या. 


पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, आता पुन्हा आक्रमकतेने बीड जिल्ह्यात काम करणार. जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही साम, दाम, दंड वापरून लढणार. तसेच विरोधक म्हणून खडा जवाब आणि कान उघडणी करणार आहे. मी नामधारी आहे असं म्हणा, मग आम्ही तीन वर्षं कुठलाही प्रश्न विचारणार नाही किंवा उत्तर मागणार नाही. 


बीड जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. नवीन निवडून आलेल्या सर्वच सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. आमदार नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी हा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. या सत्कार समारंभाला खा. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या :