मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) 31 मे पर्यंत वाढवला आहे.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा (Lockdown) तिसरा टप्पा आज 17 मे रोजी संपत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याची घोषणा आधीच केली आहे. त्यासंदर्भात केंद्र आज गाईडलाईन्स देखील जारी करणार आहे. राज्य सरकारने मात्र लॉकडाऊनबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात 31 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आलीय. आपत्कालीन व्यवस्थान कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची स्थिती वाढवणं गरजेचं असल्याचंही अजॉय मेहता यांनी या आदेशात म्हटलंय. आधीच्या लॉकडाऊनमध्ये कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स आता 31 मे 2020 पर्यंत लागू राहणार आहेत.











गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा असणार आहे, असं पाटील म्हणाले.







राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे. केंद्राच्या गाईडलाईन्स आल्यावरच चौथा लॉकडाऊन कसा असेल याबाबत सविस्तर माहिती कळणार आहे.

लॉकडाऊनचे आधीचे तीन टप्पे

पहिला लॉकडाऊन : 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन : 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन : 4 मे ते 17 मे

पंतप्रधान मोदी यांनी मागील वेळी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन-4 संदर्भात घोषणा केली होती. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत.  18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. मात्र लॉकडाऊन 4 नव्या स्वरुपात असून याचे नियम वेगळे असतील असंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.

झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं; चौथ्या लॉकडाऊनआधी राज्याची केंद्राकडे मागणी

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स जाहीर करण्याअगोदर प्रत्येक राज्याने काही मागण्या केल्या होत्या. राज्यांनी केलेली सर्वात प्रमुख मागणी आहे, म्हणजे झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं. आता झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य हे केंद्र सरकारकडे आहे.  राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले आहेत. हे सर्व झोन केंद्राने तयार केलेल्या निकषावर आधारित आहेत. त्यामुळे आम्हाला झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

लॉकडाऊन-4 चं स्वरुप कसं असणार, किती वाढणार? सर्व मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांकडे 15 मेपर्यंत लॉकडाऊन संदर्भात मतं मागवली होती. बहुतेक सर्वच मुख्यमंत्र्यांनी काही सूचना पंतप्रधान कार्यालयाकडे केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मे महिन्याच्या शेवटपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचंही सूचवलं आहे. मात्र लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2 आणि लॉकडाऊन 3 पेक्षा वेगळे नियम असण्याची देखील चर्चा आहे.