Beed: बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय. ही बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे.
बीडच्या स्वराती रुग्णालयाचा रुग्णांना मोठा आधार आहे. मात्र याच रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील, मिहीर त्रिवेदी, द्विती त्रिवेरी आणि विजय चौधरी या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
फुफ्फुसांच्या संसर्गावर वापरली जाणारी औषधे बनावट
अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातला ईटेंडरकडून कोल्हापूरच्या एजन्सीकडून पुरवण्यात आलेली ॲझिमसीम 500 ही ॲझिथ्रोमायसिनची औषधे औषध विभागाच्या तपासणीत बनावट निघाली आहेत. ही गोळी घसा, कान, फुफ्फुसांच्या संसर्गावर वापरली जाते. तब्बल वर्षभरानंतर या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून बीडच्या स्वराती रुग्णालयालाही या गोळ्यांचा पुरवठा झाल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणाची लिंक कोल्हापूर, भिवंडी ते थेट गुजरातपर्यंत जोडली जात आहे.
आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची शंका
स्वाराती रुग्णालयातील अॅझिमसिम 500 या गोळीचे नमुने, 10 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतले होते. मुंबईच्या प्रयोगशाळेकडून याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर, 18 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला. ई-टेंडरिंगद्वारे 25 हजार 900 गोळ्यांचा पुरवठा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेसने, 29 जुलै 2023 रोजी केला होता. आता हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं तपासात उघड झालं आहे. काबीज जेनेरिक हाऊस विरोधात बनावट औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी वर्धा व भिवंडी येथेही गुन्ह्याची नोंद आहे. संचालक विजय चौधरीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची औषध विभागाला शंका आहे. ही कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे.. कंपनीच्या मोबाइल क्रमांकावर औषध विभागाने नोटीस पाठवली होती. याचे उत्तर त्यांनी वकिलामार्फत व्हॉट्सअॅपवरच दिले आहे.
हेही वाचा: