Weather Update: अरबी समुद्रात असणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता पुढे सरकली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Area) सैल होत असून महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या (IMD) हवामान अहवालानुसार, पश्चिम हिमालय आणि जोडून असणाऱ्या वायव्य भागात रविवारपासून (8 Dec) वेस्टर्न डिर्स्टबन्सचा परिणाम होणार असून गारठा वाढणार आहे. परिणामी राज्यात हळूहळू तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.मात्र, येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज आहे. हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून हळूहळू तापमान घसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे अलर्ट हेाते. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा राज्यातील शेतकऱ्यांनाही फटका बसला. दरम्यान, थंडीची चाहूल लागत असताना झालेल्या वातावरण बदलामुळे राज्यात तापमानाचा पाराही वाढला होता. आता कमी दाबाचा पट्टा विरळ झाला असून चक्राकार वारेही पुढे सरकल्याचे हवामान विभागाने सांगितले असले तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेत काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित भागात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर काही भागांत आकाश ढगाळ राहणाार आहे.
कुठे पावसाची शक्यता?
भारतीय हवामान विभागाने आज (7 डिसेंबर) पावसाचा कोणताही अलर्ट दिला नसला तरी मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर,सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील धाराशिव व लातूरमध्येही पावसाचा एखादा सडाका येण्याचा अंदाज आहे.
तापमान घसरणार
राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला हाेता. राज्यात हलक्या पावसाची काही ठिकाणी शक्यता असली तरी येता तीन दिवसात तापमान हळूहळू घसरणार आहे. बहुतांश ठिकाणी किमान व कमाल तापमानात बदल होण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलं. 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे, तर 7 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.