बीड : बीडमधील गेवराईत बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोरांनी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली, तर दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला करुन लाखोंचा ऐवज लंपास केला.

गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीत ही घटना घडली. भवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या घरावर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडला.

पहाटे साडे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला. घाडगे यांच्या पत्नी अलका (वय 42 वर्ष) यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आदिनाथ घाडगे, घरात बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (वय 22 वर्ष) आणि दुसरी मुलगी स्वाती घाडगे (वय 18 वर्ष) यांच्यावरही हल्ला केला.

दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत घाडगे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर गर्भवती मुलगी वर्षाची प्रकृती चिंताजनक असून दोघींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास करुन पोबारा केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.