बीड : मागच्या दोन-अडीच महिन्यापासून आरोग्य, पोलीस यंत्रणेनेसोबतच शिक्षक सुद्धा कोरोनाच्या लढ्यामध्ये रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळालं. मग ते सुरुवातीला स्वस्त धान्य दुकानाच्या समोर बसून धान्याचा किती वाटप होतं याची नोंद घेण्यापासून ते चेकपोस्टवर किती लोक जिल्ह्यांमध्ये प्रवेश करत आहे त्याच्या नोंदी ठेवण्यापर्यंत सगळी काम शिक्षकांनी केली. पण आता शिक्षकांना किराणा सामान घरपोच देण्यासाठी काम करावं लागणार आहे. यापूर्वीच बीडच्या पाटोदा शहरामध्ये 50 शिक्षक डिलिव्हरी बॉयचं काम करत होते. आता गेवराई, शिरुर आणि वडवणी तालुक्यातील एकूण 300 पेक्षा जास्त शिक्षकांची बीड शहरासाठी ड्युटी लावण्यात आली आहे.


एका आठवड्यासाठी बीड शहरामध्ये 100 टक्के कर्फ्यू लावला आहे. ज्यांना अत्यावश्यक किराणा पाहिजे आहे, अशा नागरिकांनी ॲपद्वारे ऑनलाईन मागणी करायची आणि ते सामान घरपोच नेऊन देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बीड शहर हा कन्टेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने बीड तालुक्यातील शिक्षकांना यातून वगळण्यात आलं आहे. मात्र बीडजवळ असलेल्या वडवणी तसंच गेवराई आणि शिरुर तालुक्यातील शिक्षकांना हे काम करावं लागणार आहे.


ज्या शिक्षकांना हे काम देण्यात आलं आहे त्यांना किमान 25 किलोमीटरपासून ते 60 ते 70 किलोमीटर अंतर कापून किराणा सामानाचं वाटप करावं लागणार आहे. विशेष म्हणजे ही सगळी व्यवस्था शिक्षकांनी स्वतः करायची आहे, त्यासाठी प्रशासनाने त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही.


बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, 300 पेक्षा जास्त शिक्षकांना जिथे कोरोनाची जास्त भीती अशा परिसरामध्ये यावं लागणार आहे. यामुळे शिक्षकांमध्ये सुद्धा संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे जे शिक्षक बीडमध्ये येऊन घरपोच सामान देण्याची व्यवस्था करणार आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था अद्याप तरी कुठे केलेली नाही. त्यामुळे रोज जाऊन येऊन हे काम करणं शिक्षकांसाठी जिकिरीचं बनलं आहे.


कोरोनाच्या संकटामध्ये समाजातील प्रत्येक घटकाने शक्य तेवढं योगदान देणं गरजेचं आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ शिक्षकांनाच असं काम का दिला जात आहे असा प्रश्न शिक्षक संघटना विचारत आहेत. यापूर्वीच मराठवाडा शिक्षक संघाने शिक्षकांना डिलिव्हरी बॉयचं काम देण्याला विरोध केला होता. आता ज्या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली आहे ते सुद्धा द्विधा मनस्थितीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.