अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आज (29 मे) सकाळी अत्यंत दुःखद अशी घटना घडली. जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोनाबधित महिलेचा सकाळी मृत्यू झाला. या महिलेने काल (28 मे) रात्रीच एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला होता. मात्र आज सकाळी उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.


अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात या महिलेची सिझेरियन प्रसुती करण्यात आले होते. प्रसुतीनंतर महिला आणि दोन्ही बाळांची तब्येत बरी होती. मात्र रात्री उशिरा या महिलेला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. या महिलेला न्यूमॅटिक लक्षणं होती आणि आज सकाळी 8:45 वाजता या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.


ही महिला मुंबईहून अहमदनगर तालुक्यातील निंबलक येथे आली होती. त्यानंतर केलेल्या तपासणी ती कोरोनाबधित असल्याचं स्पष्ट झालं होतं. खरंतर या महिलेने बाळांना सुखरुप जन्म दिल्याने कुटुंबासह रुग्णलयात आनंदाचं वातावरण होतं. परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. जुळ्यांच्या जन्माच्या अवघ्या काही तासानंतरच या माऊलीने चिमुकल्यांचा निरोप घेतला.


त्यामुळे कुटुंबासह आरोग्य यंत्रणेत आनंदाची लकेर उमटली. मात्र शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता तिची प्राणज्योत मालवल्याची चटका लावणारी बातमी आली आणि सर्वच हळहळले.


दरम्यान अहमदनगरमधील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 58 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हात एकूण 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.