नागपूर : ज्या देशांमध्ये क्षय रोगापासून संरक्षणासाठी बीसीजीच्या लसीकरणाचे वैद्यकीय नियम पाळले जातात त्या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव कमी प्रमाणात होत आहे. तर ज्या देशांनी बीसीजीचे लसीकरण अनेक वर्षांपूर्वी सोडले आहे तेच देश कोरोनाला जास्त बळी पडत आहे असा एक आगळा वेगळा अभ्यास समोर आला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट ऑफ बायो मेडिकल सायन्सेसने हा अभ्यास केला आहे. विविध देशात कोविड 19 चा परिणाम वेगवेगळा का आहे? हा आधार घेऊन हा अभ्यास करण्यात आला आहे. त्यातले काही निष्कर्ष लसीकरण मोहिमेत बीसीजी ही लस बंधनकारक असलेल्या भारतासाठी अनुकूल आहेत.

क्षयरोगापासून बचावासाठी बीसीजी म्हणजेच बेसिलस कार्मेट ग्युमिन्ग हे लसीकरण केले जाते. मात्र, जगातील सर्वच देशांमध्ये हे लसीकरण केले जात नाही. अनेक प्रगत आणि श्रीमंत देशांमध्ये क्षयरोग हा तितका धोकादायक आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा रोग नसल्यामुळे अनेक प्रगत समजल्या जाणाऱ्या देशांनी बीसीजीचे लसीकरण त्यागले आहे. न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट ऑफ बायो मेडिकल सायन्सने जगात कोरोनाचा फैलाव झालेल्या अनेक देशांचा अभ्यास करत तिथल्या गेल्या अनेक दशकातील लसीकरणाचा आणि तिथे होणाऱ्या रोगराई व मृत्युदराचा अभ्यास केला. त्यामध्ये बीसीजी लसीकरण हेच कोरोना विरोधात सध्या अनेक देशांची ढाल बनल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

या अभ्यासासाठी देशांना तीन वर्गात विभाजित करण्यात आले.

1.कमी उत्पन्न असलेले मात्र बीसीजी लसीकरण करणारे देश
2.मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेले मात्र बीसीजी लसीकरण करणारे आणि मध्येच ते सोडून देणारे देश
3. मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेले मात्र बीसीजी लसीकरण न करणारे देश

कमी उत्पन्न असलेले मात्र बीसीजी लसीकरण करणारे देश
कमी उत्पन्न श्रेणीतले मात्र बीसीजी लसीकरण करणाऱ्या 18 देशात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण प्रति दहा लाख लोकसंख्या 0.09 ते 0.32 एवढे आहे. तर तिथे कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण प्रती दहा लाख लोकसंख्या जवळपास शून्य आहे.

मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेले मात्र बीसीजी लसीकरण करणारे आणि मध्येच ते सोडून देणारे देश
मध्यम आणि उच्च उत्पन्न श्रेणीतले मात्र बीसीजी लसीकरण प्रणाली कधी तरी असलेल्या 55 देशांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण 23.29 ते 59.54 प्रति दहा लाख लोकसंख्या आहे. तर तिथे कोरोनामुळे होणारे मृत्यू दर 0.40 ते 0.78 प्रति दहा लाख लोकसंख्या आहे.

मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेले मात्र बीसीजी लसीकरण न करणारे देश
मध्यम व उच्च उत्पन्न श्रेणीतले ते पाच देश जिथे कधीच बीसीजी लसीकरण प्रणाली अवलंबिली गेली नाही. अशा देशांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण 4 पटीने जास्त म्हणजेच 134.88 ते 264.90 प्रति दहा लाख लोकसंख्या एवढे जास्त आहे. स्वाभाविकरीत्या तिथे दर्जेदार आरोग्य सेवा असून ही कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण 7.33 ते 16.39 प्रति दहा लाख लोकसंख्या आहे.

वरील निष्कर्षांना पाठबळ देण्यासाठी अभ्यासात तीन देशांची तुलना ही करण्यात आली आहे.

1. इराणने 1984 नंतर बीसीजी लसीकरण प्रणाली स्वीकारली त्यामुळे तिथे वयस्कर लोकं या लसीकरणाचे लाभार्थी राहिलेले नाही. त्यामुळे तिथे वयस्कर मंडळीमध्ये कोरोनाचे मृत्यू प्रमाण 19.7 प्रति दहा लाख लोकसंख्या एवढे आहे.

2. दुसऱ्या बाजूला जपानने 1947 पासून बीसीजी लसीकरण प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे तिथे कोरोनाचा जबर फैलाव होऊन ही मृत्यू दर इराणच्या तुलनेत 100 पटीने कमी आहे. जपानमध्ये कोरोना मुळे मृत्युदर फक्त 0.28 प्रति दहा लाख लोकसंख्या आहे.

3 सर्वात महत्वाचे आकडे ब्राझीलमधले आहे. तिथे बीसीजी लसीकरण प्रणाली 100 वर्षांपूर्वी म्हणजेच 1920 मध्ये स्वीकारण्यात आली. तिथे कोरोनामुळे जाणारे मृत्यू दर 0.0573 प्रति दहा लाख लोकसंख्या एवढे नगण्य आहे.

सोप्या शब्दात सांगायचे तर ज्या देशात बीसीजी लसीकरण प्रणाली जेवढी जुनी आहे. तिथल्या वयोवृद्ध लोकांना त्यांच्या बालपणात ते लसीकरण झाल्याची शक्यता तेवढी जास्त आहे. त्यामुळेच जिथे हे लसीकरण अनेक दशकांपासून होत आहे तिथे कोरोनामुळे होणारे मृत्युदर कमी आहे.

युरोप आणि उत्तर अमेरिका सारख्या प्रगत आणि श्रीमंत देशांच्या पट्ट्यात तिथे क्षय रोगाचे एटीएल प्रमाण पाहून कधीच स्वीकारले गेले नाही किंवा अवघे काही वर्ष बीसीजी लसीकरण करून ते पुन्हा सोडून देण्यात आले. या अभ्यासात कोणत्या देशाने किती वर्ष बीसीजी लसीकरण अंगिकारले याचा ही थेट संबंध कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दृष्टी असल्याचे इंगित करण्यात आले आहे. उदा. स्पेनने बीसीजी लसीकरण मोहीम 1965 मध्ये स्वीकारली आणि अवघ्या 16 वर्षांनी म्हणजेच 1981 मध्ये सोडून दिली. स्पेनमध्ये सध्या कोरोनामुळे होणारे मृत्यू दर प्रति दहा लाख लोकसंख्या 29 एवढे जास्त आहे. त्या तुलनेत युरोप खंडातच राहून डेन्मार्कमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू दर प्रति दहा लाख लोकसंख्या फक्त 2.3 एवढे कमी आहे. त्यामागचे कारण म्हणजे डेन्मार्क मध्ये बीसीजी लसीकरण 1946 ते 1986 असे 40 वर्ष सुरु होते.

घरबसल्या कोरोनाची लक्षणं ओळखा; विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल

चीनमध्ये नेमकं कोरोनाचा थैमान का झाला असा प्रश्न पडला असेल. तर चीनने 1950 पासून बीसीजी लसीकरण प्रणाली स्वीकारली होती. मात्र 1966 ते 1978 १ असे 12 वर्ष सांस्कृतिक चीनमध्ये लसीकरण मोहीम थंडावली होती. लसीकरण मोहिमेशी संबंधित आरोग्य यंत्रणा कमकुवत करण्यात आली होती. त्यामुळेच तिथे 12 वर्षांच्या कालावधीत बीसीजी लसीकरण न झालेल्या आणि अशा रोगांचे कैरियर असू शकणारे लोकांचा एक मोठा समूह उपस्थित असण्याची शक्यता या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे.

अभ्यासातून मांडलेले काही तर्क

इटलीमध्ये तिथल्या लोकांवर अनेक बंधने घातल्यानंतर ही कोरोनाचा संक्रमण तीव्रतेने पसरला. या उलट जपानमध्ये लोकांवर फार थोडे बंधने घालण्यात आल्या तरी जपान कोरोनाचा फैलाव थांबवू शकला .


या अभ्यासात अनेक देशांचा अभ्यास करून काही संकेत देण्यात आले आहे. त्यामुळे गेले अनेक दशके बीसीजी लसीकरण मोहीम राबवणाऱ्या भारतात कोरोनाचा फैलाव काही प्रगत देशांच्या तुलनेत का कमी होतंय या चर्चेला एक पाठबळ मिळताना दिसतंय. दरम्यान या अभ्यासातील निष्कर्षांवर अद्यापपर्यंत जागतिक आरोग्य संघटना किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र, या अभ्यासाने जगापुढे एक नवे संकेत आकड्यांसह मांडले आहे आणि तेच भारताला काहीसा दिलासा देणारे आहे.



#Corona Current Update | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 416वर, एकाच दिवसात 81नवे रुग्ण