Shivsena First Rebel : सध्या सुरु असलेल्या राजकीय संघर्षामुळं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं शिवसेनेत वादळ उठलं आहे. पण शिवसेनेत हे पहिल्यांदा घडत नाहीये. 


1966 साली दादरच्या (Dadar) कदम मॅन्शनच्या व्हरांड्यात स्थापन झालेल्या या पक्षानं अनेक चढ-उतार पहिलेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची अटक पहिली तर शिवसेना भवन (Shivsena Bhavan) बाहेर झालेला बॉम्बस्फोटही पाहिला. शिवसेनेवर अनेकदा संकटं आली मात्र ती पेलायची क्षमता जितकी बाळासाहेबांमध्ये होती तितकीच त्यांच्या कडवट शिवसैनिकांमध्ये. नेते आले-नेते गेले पण पक्ष संपला नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेना ही एक 'कॅडर-बेस्ड पार्टी' आहे. ती नेत्यांवर नाही तर तिच्या कडवट शिवसैनिकांवर अवलंबून आहे. 


आज याच शिवसेनेला खिंडार पडलंय. आजवर अनेक मोठे नेते गेले मात्र डझनभर आमदार फोडण्याचीच ताकत त्यांच्यामध्ये होती. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड हा शिवसेनेतील सर्वात मोठा बंड मानला जातोय. हा जरी सर्वात मोठा बंड असला तरी हा पहिला नाही. शिवसेनेत पहिला बंड झाला तो 1967 साली म्हणजेच, पक्ष स्थापनेनंतर जवळपास वर्षभरातच.  


1970 ते 2000 पर्यंत शिवसेनेतील महत्वाचे नेते म्हटलं की, डोळ्यांसमोर येणारं नावं म्हणजे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, मधुकर सरपोतदार आणि लीलाधर डाके. मात्र हे सगळे नेते शिवसेनेत आले ते 1967 च्या नंतर आणि हे येण्याआधी शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या खालोखाल जे नेते कार्यरत होते. त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे, अॅडव्होकेट बळवंत मंत्री (Balwant Mantri).


बळवंत मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा प्रबोधनकार ठाकरे यांचे निकटवर्तीय. मार्मिकचं कार्यालय त्याकाळी बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे राहत असलेल्या दादरच्या कदम मॅन्शनमधील घरातच होते आणि त्याच मार्मिकच्या कचेरीत साप्ताहिकासोबतच संघटनेची सगळी खलबतं पार पडायची. प्रबोधनकार ठाकरे या बैठकांसाठी बळवंत मंत्री यांना आवर्जून निमंत्रण धाडायचे. अगदी शिवसेनेच्या पहिल्या सभेलासुद्धा प्रबोधनकारांनी त्यांना भाषणाची संधी दिली होती. अॅडव्होकेट मंत्री म्हणजे, एक सुशिक्षित व्यक्तीमत्व त्यामुळे समोरच्यांचे विचार पटले तरी त्यांना त्यांचं मत हे असायचंच.   


शिवसेनेच्या स्थापनेनंतर, बाळासाहेबांच्या अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या सभा व्हायच्या अगदी प्रत्येक शाखेत जाऊन बाळासाहेब ठाकरे स्वतः भाषण करायचे. त्यावेळी त्यांच्या आक्रमकतेनं अनेकांना भुरळ घातली आणि मोठ्याप्रमाणात तरुण शिवसेनेकडे वळला. बाळासाहेब ठाकरेंचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, आक्रमकता. संघटनेतंही त्यांच्या आदेशापुढे काहीच आणि कुणाचंच चालायचं नाही. बळवंत मंत्री यांना हेच खटकलं आणि त्यांनी बंड करायचं ठरवलं. आणि हाच शिवसेनेतील पहिला बंड. 


शिवसेनेची कार्यपद्धत लोकशाही तत्वानुसार असावी असं बळवंत मंत्री यांचं म्हणणं होतं. त्यांनी अचानक एक दिवस दादरच्या छबिलदास शाळेजवळ असणाऱ्या वनमाळी हॉलमध्ये पक्षाची छोटी सभा बोलवली. या सभेत ते "शिवसेनेत लोकशाही हवी" असं जाहीर करणार असल्याची खबर काही शिवसैनिकांना मिळाली.              


बळवंत मंत्री यांनी जर ते आव्हान केलं असतं तर ते थेट बाळासाहेब ठाकरे यांनाच लागू होणार होतं आणि म्हणूच शिवसैनिकांनी मंत्री यांचा हा प्लॅन हाणून पाडण्याचं ठरवलं. सभा सुरु होताच काही शिवसैनिक वनमाळी हॉलमध्ये दाखल झाले आणि सभा उधळून लावली. शिवसैनिक इथंच थांबले नाहीत, त्यांनी बळवंत मंत्री यांचे कपडे फाडले आणि वनमाळी हॉल ते बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या लाईट ऑफ भारत जवळील कदम मॅन्शनपर्यंत धिंड काढली. घराबाहेर पोहोचताच त्यांना बाळासाहेबांच्या पायावर लोटांगण घालण्यास भाग पडलं आणि पक्षाच्या धोरणांविरोधात होणार पहिला बंड कार्यकर्त्यांनी हाणून पडला. 


मात्र या घटनेमुळं एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणेजच, शिवसेनेत एकाच व्यक्तीचं चालणार, त्याच व्यक्तीनं घेतलेला निर्णय हा शेवटचा ठरणार आणि त्या व्यक्तीविरुद्ध कुणीच बोलायचंही नाही... ती व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे.                


असो, पण आज एकनाथ शिंदे यांच्या रूपात आलेलं बळवंत मंत्री यांच्यासारखंच संकट शिवसैनिक कसे उलटवून लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :