अहमदनगर : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंच्या सेल्फीवरुन सुरु झालेला वाद थांबता थांबत नाहीत. पंकजा मुंडेंच्या सेल्फीवरुन विरोधक एकवटले असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मात्र पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. “काम केलंय म्हणून फोटो काढला”, असं म्हणत थोरातांनी पंकजा मुंडेंच्या सेल्फीचं समर्थन केलं आहे.

 

“पंकजा मुंडेंनी काम केलं आहे, म्हणून फोटो काढला. पंकजा तरुण उत्साही मंत्री आहेत”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी काय केलंय?”

 

“पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी काय केलंय?” असा सवाल करत थोरातांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. “आपण काय करतोय, ते आगोदर बघा. पंकजा भर दुपारी फिरते आहे, हे कुणी पाहिलं नाही.”, असे म्हणत थोरात पंकजा यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

 

“पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी आपल्या घरातील एसी बंद केले का?” असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी टीकाकारांना केला आहे.

 

दुष्काळावर उपाययोजना करण्यात सरकार अपयशी

 

“टँकर चालू करण्यासाठी सरकारनं घातलेल्या अटी जाचक आहेत. आमच्या काळात टँकर सुरु करण्यास प्राधान्य होते. मात्र, आता अटींमुळे जनतेला पाणी मिळत नाही. सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलं आहे.”, अशी टीका थोरातांनी सरकारवर केली आहे.

 

 

सेल्फीवर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

 

दरम्यान, हौसेपोटी नाही तर जलंसधारणाची कामं पूर्ण झाल्याचा आनंद झाला आहे. त्यामुळे आपण सेल्फी काढलाय. असं म्हणत ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फीच्या वादावर स्पष्टीकरण केलं आहे. मात्र सोशल मीडियावरुन पंकजा मुंडेंवर टीकेची झोड उठली आहे.