मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे नेतृत्व बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन त्याबाबत माहिती जाहीर करण्यात आली आहे. तसेच यावेळी एका अध्यक्षासह पाच कार्यकारी अध्यक्षांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.


डॉ. नितीन राऊत, डॉ. बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन या पाच जणांची कार्यध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


कार्याध्यक्ष नेमणूक करताना पक्षाने प्रादेशिक संतुलन आणि जातीय समीकरणांचा विचार केल्याचे दिसून येत आहे. नितीन राऊत, यशोमती ठाकूर हे विदर्भातील नेते आहेत, विश्वजीत कदम पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तर बसवराज पाटील मराठवाड्यातील नेते आहेत.


इतर नियुक्त्या 


बाळासाहेब थोरात - रणनीती समिती, अध्यक्ष
पृथ्वीराज चव्हाण - जाहीरनामा समिती, अध्यक्ष
सुशीलकुमार शिंदे - समन्वय समिती, अध्यक्ष
नाना पटोले - प्रचार समिती, अध्यक्ष
रत्नाकर महाजन - प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष


लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. काँग्रेसला राज्यात केवळ एका जागी विजय मिळाला होता. राज्यातील या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.


लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. अनेक मोठे नेते, आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यात पक्षनेतृत्व बदलाची गरज होती, तशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून होती. त्यामुळे राज्यात काँग्रेसने नव्याने पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.