Bakra Eid 2023: यंदा 29 जूनला देशभरात मुस्लिम समाजाकडून बकरी ईद (Bakra Eid) हा सण साजरा केला जाणार आहे. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 


बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात. ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात. याच सणाला ईद-उल-जुहा म्हणतात ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व समजले जाते. या दिवशी रमजान ईद प्रमाणे सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन ईदची नमाज अदा करतात. सोबतच या दिवशी इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम समाजात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. ज्याला बकरी ईद म्हणतात. सौदी अरबमध्ये उंट आणि मेंढा यांची कुर्बानी देण्यात येते. विशेष म्हणजे यासाठी घेण्यात येणारा प्राणी कष्टाच्या पैशांनी घेण्यात यावा, म्हणजेच चुकीच्या पद्धतीने कमवलेल्या पैश्यातून घेतलेला नसावा. त्यानंतरच कुर्बानी मान्य होते. पण कुर्बानीचा देखील एक इतिहास आहे. 


कुर्बानी का केली जाते? 


कुराणमध्ये असलेल्या उल्लेखानुसार इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम यांचा उल्लेख करण्यात येतो. तसेच मुस्लिम धर्मात हजरत इब्राहिम यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. त्याचं झाले असं की, अल्लाहने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांची सर्वांत प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले. दरम्यान बऱ्याच विचार केल्यावर त्यांना आपला एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय असल्याचे कळाले. विशेष म्हणजे त्यांना वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळात पुत्रप्राप्ती झाली होती. पण मुलाची कुर्बानी करण्याचा आदेश अल्लाहचा होता. अल्लाहच्या मर्जीसमोर कुणाचे काहीही चालत नाही, असा विचार करत इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बान देण्यासाठी त्याला घेऊन निघाले.  


दरम्यान याबाबत त्यांनी आपल्या मुलाला देखील सांगितले. पण अल्लाहची मर्जी असेल तर आपली कुर्बानी द्यावी असे त्याने आपल्या वडिलांना सांगितले. तर मला पाहून तुमच्या मनात प्रेम जागे होईल म्हणून त्याने आपल्या वडिलांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली. काही वेळाने त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून हातातील तलवारीने जोराने मुलाच्या गळ्यावर वार करून त्याची कुर्बानी दिली. मात्र डोळ्यांवरील पट्टी हटवल्यानंतर त्यांना त्यांचा मुलाच्या जागी 'दुंबा' म्हणजेच मेंढा कुर्बान झाल्याचे दिसले. तर त्यांचा मुलगा बाजूला उभा होता. कारण अल्लाहने त्यांच्या मुलाच्या जागी मेंढा ठेवून त्यांच्या मुलाची कुर्बानी घेतली नाही. तसेच हा सर्व प्रकार इब्राहिम यांच्या परीक्षेचा भाग होता. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा मुस्लिम समाजात सुरू झाली, असे सांगितले जाते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय