Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी आणि बकरी ईद (Bakra Eid) हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हिंसाचाराच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बैठकीत आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लीम बांधवांकडून कुर्बानी न करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी असे निर्णय घेण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार आणि बुलडाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पंढरपूरात दुसऱ्या दिवशी होणार कुर्बानी....
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज भागातील प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकदाशीला मोठी गर्दी असते. तसेच पंढरपुराला जाऊ न शकणारे वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र याच दिवशी बकरी ईद असल्याने पोलिसांनी शांतता बैठक बोलावली होती. दरम्यान या बैठकीत आषाढी एकादशीला कुर्बानी न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवानी घेतला आहे.
जालना जिल्ह्यातील रामनगरमध्ये एकादशीला कुर्बानी होणार नाही
जालना जिल्ह्यातील रामनगर गावच्या मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देता, ईदच्या दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय घेतलाय. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने कुर्बानी टाळण्यासाठी गावातील मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये एकत्रित बैठक घेतली. ज्यात हा एकमताने निर्णय घेण्यात आला. गावचे सरपंच आणि शांतता समितीच्या सदस्यांनी यात सहभागी होऊन मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाच स्वागत केले आहे. तसेच प्रतिष्ठीत नागरिकांकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकतेचा अनुभव
संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा प्रत्यय आला आहे. जिल्ह्यातील बारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईदच्या दिवशी आषाढी एकादशी येत असल्याने या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. मुस्लिम समाज दुसऱ्या दिवशी कुर्बानी देणार असल्याने या निर्णयाने दोघे समाजांमध्ये बंधूभाव वाढीस प्रेरणा मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी हा निर्णय घेतला गेल्याने येत्या काळात जिल्ह्यात सामाजिक एकात्मता कायम राहण्यास मदत होणार आहे. पोलिसांकडून यासाठी गावनिहाय शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकींना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यात एकादशी आणि बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
देऊळगाव राजामध्ये मुस्लिम बांधवांनी घेतला महत्वाचा निर्णय
यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने सामाजिक सलोखा कायम रहावा म्हणून जग प्रसिद्ध बालाजी मंदिर असलेल्या देऊळगाव राजा व विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील मुस्लिम बांधवांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीला कूर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. दरम्यान मुस्लीम बांधवांनी पोलिस प्रशासनास याबाबत पत्र कळवले आहे. तर या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. सोबतच देऊळगाव राजा शहरात सामाजिक सलोखा कायम रहावा म्हणून, मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी निमित्त हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर देऊळगाव राजा येथील पोलीस निरीक्षक जयवंत सताव यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याच्या भावना मुस्लिम बांधवांनी बोलून दालखविल्यात.
इतर महत्वाच्या बातम्या: