Nashik Shivsena : नाशिक महापालिकाच्या (Nashik NMC) कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष पदावरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू होता. शिवसेना नगरसेवक आणि कामगार युनियनचे अध्यक्ष बंटी तिदमे यांनी शिंदे गटात (Shiv Sena) प्रवेश केल्याने ठाकरे गटाचे महानगर प्रमुख यांनी युनियनच्या अध्यक्ष पदावर दावा सांगितला होता, त्यातून बरंच नाट्य रंगलं होतं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर याबाबत महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे. 


सत्तांतर झाल्यापासून नाशिक शहरात शिवसेना (Shiv Sena) आणि ठाकरे गटात अनेक कारणांवरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही गटात नेहमीच वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच नाशिक मनपाच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्षपदावरून दोन्ही गटात कलगीतुरा रंगला होता. दोन्ही गटाकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात आला होता. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाच्या (Thackeray Sena) बाजूने निर्णय दिला आहे. नाशिक म्युनिसीपल कर्मचारी सेनेच्या कार्यालय अध्यक्षपदी सुधाकर बडगुजरच राहतील, असा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी देखील अध्यक्षपदावर दावा ठोकला होता. मात्र न्यायालयाने निर्णय दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 


गेल्या वर्षी कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे (Pravin Tidme) यांनी ठाकरे गटाला सोडचिट्ठी दिली असता, त्यांनी कर्मचारी सेनेच्या कार्यालयावर दावा केला होता. तर ठाकरे गटाचे माजी मंत्री बबन घोलप यांनी तिदमे यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करत बडगुजर यांना अध्यक्ष केले होते. नंतर दोन्ही गटाकडून कार्यालयावर दावा सांगितला जात असताना कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन पोलीस प्रशासनाकडून कार्यालय सील करण्यात आले होते. सरकारवाडा पोलिसांकडून बेकायदेशीरपणे संघटनेचे कार्यालय सील केल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सहा महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. 


सत्तांतरानंतर अध्यक्षपदाचा वाद रंगला होता... 


सत्तांतरानंतर बबनराव घोलप यांनी संघटनेच्या अध्यक्षपदावरुन प्रवीण तिदमेंची हकालपट्टी केली होती. तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घोलप यांनी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची अध्यक्षपदी निवड केली. मात्र यानंतरही तिदमे यांनी संघटनेच्या अध्यक्षपदावरील दावा कायम ठेवला. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बडगुजर यांनी महापालिका मुख्यालयातील संघटनेच्या कार्यालयात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, बडगुजर आणि इतरांनी आपल्या कार्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेतल्याची तक्रार तिदमेंनी केली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, नाशिक शहर पोलीस यांनी कलम 145 आणि कलम 146 च्या अधिकारांतर्गत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्यालय सील केलेे होते. दरम्यान कर्मचारी सेनेचा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याने आनंदाचे वातावरण आहे.


सुधाकर बडगुजर म्हणाले... 


"म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची सर्वसाधारण सभा 27 सप्टेंबर 2022 रोजी झाली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. 21 ऑक्टोंबर रोजी युनियन कार्यालयाचा ताबा विधीवत पूजा करुन घेतल्यानंतर 25 तारखेला पालकमंत्री यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने बेकायदेशीरपणे युनियनचे कार्यालय सील केले होते. त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी चालू असताना पोलीस प्रशासनाला बेकायदेशीर केलेली ऑर्डर माघार घेण्यास सांगितले. पोलीस प्रशासनाने दोन दिवसाची वेळ मागून घेतली असून मंगळवारी न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. याबद्दल न्यायालयाचे आभार मानतो," असं सुधाकर बडगुजर म्हणाले.


हेही वाचा


Nashik Shivsena : संजय राऊत यांना बाजूला करा, पुन्हा एकदा तीच शिवसेना दिसेल... शिवसैनिकांनी व्यक्त केली इच्छा