Manikrao Kokate : राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली होती. मात्र, एकाच दिवसात नाशिक (Nashik) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली. नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपाचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. यामुळे नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे दिसून आले. यानंतर रविवारी रात्री उशिरा नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील (Mahayuti) वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


माणिकराव कोकाटे म्हणाले की, पालकमंत्रिपदाची नेमणूक करणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली असते. मी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी फिरतो आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदाची आमची मागणी तर आहेच, ती पूर्वी देखील होती आणि आजही आहे. नाशिकमध्ये आमचे 7 आमदार आहेत. आमचे आमदार जास्त म्हणून आमची या पालकमंत्रिपदासाठी मागणी आहे. माझ्याबाबत माझा पक्ष निर्णय घेईल. नंदुरबारच्या पालकमंत्रिपदी निवड झाली, त्यात मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


पालकमंत्री स्थानिक असावा


ते पुढे म्हणाले की, बदलाबाबत मला माहिती नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात ताळमेळ नाही, अशी चर्चा चुकीची आहे. पालकमंत्री हा स्थानिक असावा ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. दुसऱ्या जिल्ह्यात नॉर्मल पाटी टाकायला जायचं, असे चांगलं नाही. पालकमंत्रिपदावर दावा कोणीही करू शकतं, त्यात वाईट नाही, असेही माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादी नरहरी झिरवाळ हे पालकमंत्री आहेत. आता महायुतीतून नाशिकच्या पालकमंत्रिपदी नक्की कुणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Eknath Shinde: पालकमंत्रिपदावरुन महायुतीत खदखद; नाराज एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी बावनकुळे अन् महाजन हेलिकॉप्टरने दरे गावाला निघाले


Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण