बी.कॉम. प्रथम वर्षाचा निकाल 3 वेळा लावण्याचा पराक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रकार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बी.कॉम. प्रथम वर्षाच्या कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात सातशे विद्यार्थी नापास झाले. 24 तासात त्यांना पुन्हा पास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बीकॉम प्रथम वर्षाचा निकाल तीन वेळा लावण्याचा भीम पराक्रम केला आहे. सुरुवातीच्या निकालात बीकॉम प्रथम वर्षाच्या कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात जवळपास सातशे विद्यार्थी नापास झाले. 24 तासात त्यांना पुन्हा पास करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा नापास केले गेले.
हातात तीन तीन मार्कमेमो घेऊन उभा असलेले हे मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बीकॉमच्या प्रथम वर्षात शिकणारी आहेत. त्यांच्या हातातले तीन-तीन मार्क मेमो ही विद्यापीठाची देणं आहे. त्याचं झालं असं की, कोरोनामुळे विद्यापीठानं परीक्षा 10 ते 27 मे पर्यंत ऑनलाईन घेतल्या. 9 जूनला निकाल लागला. विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण कम्प्युटर ॲपलिकेशन या विषयात जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना समान गुण आणि नापास करण्यात आलं होतं.
हे सगळं प्रकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रक कुलगुरू यांची भेटही घेतली पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. परीक्षा ऑनलाईन झाल्यामुळे पुन्हा रिचेकिंग करण नसण्याचा देखील विद्यापीठ म्हणालं. पण प्रश्न असा आहे की एकाच वर्षाचा विद्यापीठ तीन-तीन वेळा निकाल कसा लावू शकतो. ऑनलाईन परीक्षेत सातशे ते आठशे मुलांना समान गुणही कसे मिळू शकतात. आणि बरं पास आणि नापास करायला हा काय बाजार थोडाच आहे. याविषयी आम्ही विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र कुलगुरूंनी कॅमेरा समोर येऊन बोलण्यास नकार दिला.
या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्र-कुलगुरू कुलगुरूंची भेट घेतली .मात्र कुलगुरूंनी कॅमेरासमोर घेऊन बोलण्यास नकार दिला. मात्र एबीपी माझाशी बोलताना कुलगुरू असं म्हणाले की, पहिला आणि तिसरा निकाल बरोबर आहे. दुसरा मार्क मेमो निघाला कसा यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. जर विद्यार्थ्यांना यांची गुणपत्रिका हवी असेल तर ती देखील आम्ही द्यायला तयार आहोत असे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गतवर्षी ऑनलाईन परिक्षेला झालेला सावळागोंधळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. आता निकालात गोंधळ पाहायला मिळतो आहे. शिवाय एकाच वर्षीच्या परीक्षेत तीन-तीन निकाल लावण्याचा पराक्रमही विद्यापीठाच्या नावावर आहे. काही असो विद्यापीठाच्या या सावळ्या गोंधळात सात-आठशे विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न मात्र आहे. त्यामुळे विद्यापीठाने यावर योग्य वेळेत योग्य निर्णय घ्यावा हीच अपेक्षा.