अकोला : अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला होता. त्यामुळेच म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जातेय, अशी टीका वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोबतच अयोध्या हे बौद्ध संस्कृती जपणारं शहर होतं, असा दावा आंबेडकरांनी केला आहे. अयोध्येचा निकाल पुढच्या काळातही जगात भारतीयांवर संशय वाढविणारा असेल असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.


उद्या अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा होत आहे. या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा अयोध्या खटल्याच्या निकालावर टीका केली आहे. पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. मात्र, अयोध्या निकाल देतांना भावनिकतेला महत्व दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा निकाल तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले की, जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते. मात्र, याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार अयोध्येत होत असल्याचं ते म्हणाले. हे सत्य भारतीय मानायला आजही तयार नसल्याचं आंबेडकर म्हणालेत.


 अयोध्या हे बौद्ध संस्कृती जपणारं शहर : आंबेडकर


अयोध्या हे बौद्ध संस्कृतीचं केंद्र असल्याचं सांगतांना त्यांनी 'राहुल संस्कृती' या इतिहासकाराचा दाखला दिला. राहुल यांच्यानुसार, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला आणि पुराव्यांना ग्राह्य धरण्यात आले नाही. अन त्यातूनच राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला गेल्याचा आंबेडकर म्हणालेत. अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की, अयोध्या ही पूर्वी 'साकेत 'नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते तर भारतीयांकडे ज्या संशयीत नजरेने पाहिले जाते ते दूर झाले असते. असं आंबेडकर म्हणालेत.

"भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र, अलिकडचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल", असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणालेत.


संबंधित बातम्या :