नवी दिल्ली : ऐतिहासिक राममंदिराच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जोरात सुरु आहे. यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात गाजलेल्या मु्द्दा निकालात निघाला असून अयोध्येत अखेर राम मंदीर बांधण्यात येणार आहे. देशभरातील अनेकांच्या मनात अयोध्येत भव्य राम मंदीर उभारलं जावं अशी इच्छा होती. अखेर तो क्षण आला आहे. अशी एक इच्छा होती, एका आजींच्या मनात. त्यासाठी त्यांनी गेल्या 28 वर्षांपासून एक संकल्प केला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणाऱ्या या आजींचं नाव आहे उर्मिला चतुर्वेदी.


साधरणतः 28 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये राहणाऱ्या उर्मिला चतुर्वेदी यांनी राम मंदीर निर्माणाबाबत एक संकल्प केला होता. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणानंतर उर्मिला यांनी अन्न त्याग करण्याचा संकल्प केला असून जोपर्यंत राम मंदिर बांधण्यास सुरुवात होणार नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा निश्चय त्यांनी केला होता. आता 5 ऑगस्ट रोजी देशातील भव्य राम मंदिराचा अयोध्येत भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे उर्मिला यांचा संकल्प पूर्ण होणार आहे.


1992मध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरण घडलं त्यावेळी उर्मिला चतुर्वेदी 53 वर्षांच्या होत्या. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यानंतर उर्मिला यांनी संकल्प केला होता की, जोपर्यंत सर्वांच्या सहमतीने मंदिर बांधण्यास सुरुवात होणार नाही, तोपर्यंत त्या अन्नग्रहण करणार नाहीत.


उर्मिला यांनी अन्नत्याग केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना हा संकल्प सोडण्यासाठी अनेकदा विनवण्या केल्या. परंतु, उर्मिला यांचा निश्चय दृढ होता. तेव्हापासून यांनी अन्नग्रहण केलेलं नाही. त्या फक्त फलाहार घेत आहेत. उर्मिला यांच्या घरात राम दरबार असून त्या दररोज तिथे बसून राम नावाचा जप करतात.


राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह 'हे' पाच जण!

भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावात 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचं भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. उर्मिला चतुर्वेदी यांची इच्छा आहे की, अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन घेतल्यानंतरच त्या आपला संकल्प सोडणार आहेत. परंतु, कोरोना काळात हा सोहळा पार पडत असल्यामुळे मोजक्याच लोकांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बाहेरील शहरातून अयोध्येत येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. उर्मिला यांच्या कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, घरीच राहून टिव्हीवर लाईव्ह कार्यक्रम पाहून त्यांचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :