Ayodhya Poul : कल्याण लोकसभा मतदारसंघाचा (Kalyan Lok Sabha Constituency) तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत. मात्र कल्याण आणि ठाणे लोकसभेवर भाजपकडून (BJP) दावा करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीकडून (Mahayuti) अद्याप या मतदारसंघावर उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) वाट्याला आली आहे. मात्र ठाकरे गटाकडून देखील या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. 


काल ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आशीर्वादाने कल्याण लोकसभा निवडणूक लढवत असल्याची पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट करून सारवासारव केली. यानंतर अयोध्या पोळ यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. 


श्रीकांत शिंदेंविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा


यानंतर अयोध्या पौळ म्हणाल्या की, कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून कोणी उमेदवार लढण्यास तयार नसेल तर निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. जर कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून इतर कोणताही उमेदवार नसेल आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) जर त्या ठिकाणी उभे असतील तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


...म्हणून इच्छा व्यक्त केली


त्या पुढे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी जर संधी दिली तर मी नक्कीच त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढेल. पक्षातील नेत्यांना सुद्धा मी माझी इच्छा सांगितली आहे. एकीकडे पक्षातील अनेक नेते सोडून गेले असा निष्ठावंत पक्षात असताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझी इच्छा व्यक्त केली आहे. 


कालच ट्विट एप्रिल फुलसाठी


माझी इच्छा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली आहे. साध्यातल्या साध्या कार्यकर्त्यालाच मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांनी मोठे केले आहे. ते जे निर्णय घेतील तो माझ्यासाठी योग्य असेल.  काल मी जे ट्विट केलं होतं ते एप्रिल फुलसाठी केलं होतं. मात्र त्यानंतर सर्व समर्थकांनी कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद त्याला दिला. माध्यमांनी सुद्धा बातम्या केल्या, असेही त्यांनी म्हटले आहे.