शुक्रवारी (11 मे) रात्री औरंगाबाद शहरात दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून शहरात जाळपोळ झाली होती. या जाळपोळीत घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं. दोन्ही गटांमधील दगडफेकीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.
पोलिसांच्या गाड्यांचाही जाळपोळ, दहा पोलिस जखमी
औरंगाबादमधील जाळपोळीत पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले. दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले.
एसीपी गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर
औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी गोवर्धन कोळेकर यात गंभीर जखमी झाले आहेत. गोवर्धन कोळेकर यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोळेकर यांना उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात येणार आहे.
जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याची माहिती औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दिली.
कोण आहेत गोवर्धन कोळेकर?
गोवर्धन कोळेकर सध्या औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी आहेत. जीगरबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद जेव्हा औरंगाबादमध्ये उमटले, तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी कोळेकर स्वतः पुढे गेले होते. त्यावेळी झालेल्या दगडफेकीतही त्यांना एक दगड लागला होता.
औरंगाबाद जाळपोळ प्रकरण नेमकं काय आहे?
औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा परिसरात 11 मे रोजी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद सुरु झाला आणि त्याचं पर्यावसन दगडफेक आणि जाळपोळीत झालं. घरं, दुकानं आणि रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेली वाहनं यांच्या तोडफोड करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली.
या दगडफेक, जाळपोळीत 30 ते 40 जणं जखमी झाले, तर दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
औरंगाबाद शहरात झालेल्या दोन गटातील दगडफेक आणि जाळपोळीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या प्रकराच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्य मंत्री (शहर) रणजित पाटील यांनी दिली. त्यानंतरच खरे कारण कळू शकेल.
औरंगाबाद शहरात नेमकं काय झालं?
रात्री 10 वाजता (11 मे) - औरंगाबादमधल्या जाळपोळीची पहिली ठिणगी गांधीनगर आणि मोतीकारंजामध्ये पडली. क्षुल्लक कारणावरुन तरुणांमध्ये हाणामारी सुरु झाली आणि त्याला सोशल मीडियाने हवा दिली.
रात्री 11 वाजता (11 मे) - गांधीनगरात सुरु झालेला वाद सोशल मीडियामुळे पसरत गेला. शहागंज भागात दोन गट समोरासमोर आले. एकमेकांवर दगडफेक सुरु झाली. घरासमोरच्या गाड्या पेटवण्यात आल्या. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत शहागंज पेटलं होतं.
मध्यरात्री 2 वाजता (11 मे) - आतापर्यंत या दंगलीचं लोण गांधी पुतळा, लोटाकारंजा, नवाबपुरा या भागापर्यंत पोहोचलं होतं. निजामुद्दीन चौकात जाळपोळ सुरु झाली. चिंचोळ्या गल्ल्यांच्या या भागात आग भडकत गेली आणि दुकाने जळाली.
पहाटे 3 वाजता (12 मे) - या दंगलीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना कठोर व्हावं लागलं. सुरुवातीला पोलिसांनी लाठीमार सुरु केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्लॅस्टिक बुलेटने फायरिंग केलं. यात 17 वर्षांचा मुलगा जखमी झाला. जखमी झालेल्या तरुणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पहाटे 4 वाजता (12 मे) - पण तितक्यात निजामुद्दीन चौकातल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि सगळीकडे अंधार पसरला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण झाला. पुढचा तासभर गांधीनगर, निजामुद्दीन चौक, मोतीकारंजा चेलिपुरा, मंजूरपुरा, शहागंज भागात जाळपोळ सुरु झाली.
सकाळी 8 वाजता (12 मे) - दिवस उजाडताच जाळपोळ आटोक्यात आली. दिवसा उजेडी सारं काही शांत होईल असं वाटत असतानाच राजाबाजारमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. कारण इथे अज्ञातांनी एका दुकानावर पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या.
दुपारी 12 वाजता (12 मे) - दुपारी बारा वाजेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली. पण चंपा चौक आणि रोशन गेट भागात मात्र आग धुमसतच होती. अवघ्या 14 तासांमध्ये क्षुल्लक कारणावरुन दोन जण दगावले, 51 जण जखमी झाले, 100 दुकानं फुटली, अनेक दुचाकी आणि चारचाकी जाळल्या, तर दोन घरं कोसळली. फक्त एका किरकोळ घटनेपायी...
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान
औरंगाबाद का धुमसलं? जाळपोळीची कारणं काय?
औरंगाबाद जाळपोळ : एसीपी गोवर्धन कोळेकर गंभीर जखमी