सातारा: शरद पवारांना आपली कॉलरची स्टाईल आवडली, याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी दिली. ते काल कराडमध्ये बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंच्या कॉलरच्या स्टाईलवरुन मिश्किल भाष्य केलं होतं.

साताऱ्यात राष्ट्रवादी अंतर्गत सुरु असलेल्या गटबाजीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल शब्दात फटकेबाजी केली होती. आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असं म्हणत खासदार उदयनराजे यांच्या स्टाईलवर पवारांनी मार्मिक शेरेबाजी केली होती.

त्यावर आता उदयनराजेंनी आनंद व्यक्त केला.

"शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून, त्यांना माझी कॉलरची स्टाईल आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटले",  असं उदयनराजे म्हणाले.

मी असल्यावर सर्वांची कॉलर सरळ : शरद पवार   

दरम्यान, या पत्रकार परिषदेत उदनयराजेंनी साताऱ्यातल्या राष्ट्रवादीअंतर्गत सुरु असलेल्या कलहावरही खुमासदारपणे भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला तिकीट देईलच अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी आहे, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं.

हिम्मत असेल तर मैदानात या

“माझे पोट राजकारणावर चालत नाही. लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे, राजेशाही असती तर एका एका आमदाराला दाखवले असते. हिम्मत असेल तर मैदानात या. अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच”, असा इशारा उदयनराजेंनी दिला.

मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीत काय चर्चा झाली हे आत्ताच कशाला सांगू?  चर्चा झाली एव्हढं नक्की, असं उदयनराजे म्हणाले.

चार दिवसांपूर्वीच उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेला 'राजधानी महोत्सव' आणि इतर विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी उदयनराजे साताऱ्याहून मुंबईला आले होते. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर फडणवीस आणि उदयनराजे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली.

साताऱ्यामध्ये 25 ते 27 मे दरम्यान 'राजधानी महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत 'राजधानी महोत्सव' होणार आहे.



संबंधित बातम्या

मी असल्यावर सर्वांची कॉलर सरळ : शरद पवार  

खासदार उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर