मुंबई : पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या एका तरुणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं ताब्यात अटक केली आहे. या तरुणाचा मुंबईतील संवेदनशील आणि अतिमहत्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याचा कट असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आल्याचं एटीएसकडून सांगण्यात आलं आहे.


फैजल मिर्झा बेग असं या तरुणाचं नाव असून तो इलेक्ट्रिशियन आहे. अंबोली-जोगेश्वरी परिसरातून 11 मे रोजी या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. 21 मे पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीने या तरुणाला संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याला दुबईमार्गे पाकिस्तानच्या कराचीत पाठविण्यात आलं. त्यानंतर त्याची रवानगी पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये करण्यात आली. जिथे त्याला शस्त्र चालवणं, बॉम्ब बनवणं, आत्मघाती हल्ले करणे, अशा घातक कृत्यांचे प्रशिक्षण देण्यात आलं.

एटीएसनं एका पत्रकाद्वारे याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.