औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या आपेगाव येथे डेंग्यू (Dengue) सदृश आजाराने नववीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. गावात मोठ्या प्रमाणात हिवतापाचे रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा आणि तालुका आरोग्य यंत्रणा आपेगावात दाखल झाली आहेत. तर संशयित रुग्णांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. वेदिका विजय गडकर (वय 14 वर्षे, रा. आपेगाव, पैठण, औरंगाबाद) असे मयत मुलीचं नाव आहे.
पैठण तालुक्यातील आपेगावातील शंभरच्या आसपास ग्रामस्थ तापाने फणफणले असून पैठण शहर, आपेगाव, नवगाव, येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. गावात अचानक डेंग्यू सदृश आजारामुळे तापाने फणफणले आहेत. यात अनेक लहान मुलांचा देखील समावेश आहे. दरम्यान गावातील परिस्थिती पाहता गावाचे सरपंच पांडुरंग औटी यांनी याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांना दिली. माहिती मिळताच तालुका आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली असून, रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तसेच संशयित रुग्णांची देखील तपासणी केली जात आहे. तसेच ग्रामपंचायतकडून घरोघरी जाऊन माहिती घेतली जात आहे.
आपेगाव येथील वेदिका विजय गडकर ही विद्यार्थिनी गावातील संत ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिकत होती. ती नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी शाळेत गेली. शाळेतून घरी आल्यानंतर तिला अचानक ताप आला. अस्वस्थ वाटू लागल्याने तिला पैठण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री उपचारादरम्यान तिचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर याच गावातील एका युवकास डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर पैठण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे मयत मुलगी वेदिका गडकर हिला ही डेंग्यूच झाला असावा, असा येथील ग्रामस्थांचा अंदाज आहे. याबाबत डॉक्टरांचा अहवाल मात्र आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतर वेदिका गडकर हिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
गावात खळबळ उडाली...
आपेगावात अचानक अनेकजण एकामागून एक आजारी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या सर्वांना ताप येत आहे. गावात सध्या 100 पेक्षा अधिक नागरिक आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. यातील अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहे. मात्र, वेदिका नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यावर गावात खळबळ उडाली आहे. तर गावात आरोग्य विभाग दाखल झाले असून, तपासणी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nagpur: नागपूरमध्ये डेंग्यूमुळं एकाचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण