नाशिक : एकीकडे नाफेडच्या (NAFED) माध्यमातून कांदा खरेदी सुरु असताना आता नाफेडमार्फत कांदा खरेदीबाबत होर्डिंग लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. यावर कांदा खरेदीबाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लादण्यात आल्या असून यात 'वास येत असलेला, विळा लागलेला, काजळी बसलेला' कांदा स्वीकारला जाणार नाही, अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत. तर या 'जुन्याच अटी असून यात नव्याने अटी घालण्यात आल्या नसल्याचे' स्पष्टीकरण देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mudne) यांनी दिले आहे.
नाशिक (Nashik) जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेड मार्फत बाजार समितीवर तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जरी काढले असले तरी मात्र अद्यापपावेतो ही खरेदी सुरू झालेली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार (Pimpalgaon Bajar Samiti) समितीमध्ये मालाला भाव कमी मिळतो आहे. तसेच नाफेडने अद्याप खरेदी सुरू केलेली नसल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे नाफेडने कांदा खरेदीसाठी लावलेल्या नियम व अटी बघता शेतकऱ्यांचा कांदा नाफेड केंद्रावर विक्री होणार तरी कसा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. बाजार समित्यांबाहेर नाफेडच्या खरेदीबाबतचे होर्डिंग लावण्यात आले असून त्यावर जाचक नियम व अटी देण्यात आल्या आहेत.
नाफेडच्या होर्डींगवर दिलेल्या नियम व अटी
नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरवात झाली असून नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती परिसरात खरेदी केंद्र सुरु आहे. या खरेदी केंद्राबाहेर नाफेडमार्फत होर्डिंग लावण्यात आलेलं आहेत. यात शेतकरी बांधवांसाठी सूचना दिलेल्या आहेत. यात प्रति हेक्टर 280 क्विंटल पेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही. दर्जेदार 45 मिमीच्या पुढचा चांगला कांदा चालेल, असे सूचित करण्यात आले आहे. तर खालील गुणवत्ता असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही - यात विळा लागलेला, पत्ती लागलेला, काजळी असलेला, रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, गरम मऊ असलेला, बुरशीजन्य, वास येत असलेला, मुक्त बेले असलेला कांदा स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्टपणे लिहलेले आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
अटी ज्या पूर्वी होत्या, त्याच आजही आहेत. बाकी काही नव्याने घातलेल्या नाहीत. ज्यावेळी कांद्याचे भाव पडले, त्यावेळी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात आली. त्यावेळी देखील अशा अटी लावण्यात आलेल्या होत्या. त्याच धर्तीवर आत्ताही खरेदी करण्यात येत आहे. वेगळी अट अशी काही घेतलेली नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. केंद्र सरकारने 2410 क्विंटल ने कांदा खरेदीचा निर्णय घेतला. दोन लाख टन कांद्याची खरेदी या ठिकाणी चालू झाली आहे. नाफेडच्या जवळजवळ सर्व सेंटरला ही कांदा खरेदी सुरू झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नाफेड किंवा एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रावर जाऊन कांदा विक्री करण्यापेक्षा नाफेड एनसीसीएफने कांदा बाजारात यावं आणि कांदा खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने प्रश्न असून या संदर्भात स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा समाधान होईल, असा मार्ग काढण्यात येईल असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
इतर महत्वाची बातमी :