औरंगाबाद : शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं असून, अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यामुळे आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. तर यावरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिकिया देखील येत आहेत. दरम्यान शरद पवारांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची प्रतिक्रिया आली आहे. “संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य सातत्याने केली जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय हे सत्य असल्याचं दानवे यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद येथे पत्रकार परिषेदत बोलतांना दानवे म्हणाले की, "निवडणूक आयोगात पक्ष चिन्ह वाचवण्यासाठी पवारांनी असे वक्तव्य केले असावे. मात्र यातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय हे सत्य आहे. तर, संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य सातत्याने जात आहेत. मात्र, महाविकास आघाडी वर याचा फरक पडणार नाही. पण, आमच्याही पक्षात आशा विधानामुळे गोंधळ होतो हे सत्य आहे. अशी भूमिका वारंवार येत असेल तर आम्ही काय समजावे.
अशा वक्तव्यांमुळे चर्चा आणि संभ्रम होईल यात शंका नाही. फसवणूक नाही मात्र राष्ट्रवादी (शरद पवार गट) बाबतची भूमिका शिवसैनिक सातत्याने वरिष्ठांकडे मांडतोय. तर, शरद पवारांच्या वक्तव्यांचे परिणाम होतोय. आमच्या आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. मात्र, तरीही आम्ही सरकारच्या दारात जात नाही. राष्ट्रवादीच्या सगळ्याचं आमदारांना अजित पवार यांनी निधी दिलाय. त्यामुळे ते दोन्ही बाजूने निधी घेतायत असे दानवे म्हणाले.
'इंडिया आघाडी'वर कोणताही परिणाम होणार नाही
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यानी एकत्र येऊन 'इंडिया आघाडी'ची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे याच 'इंडिया आघाडी'ची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असतानाच त्यापूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, "इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचे फार परिणाम होईल अशातला भाग नाही. तर, यावर अजून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भूमिका सांगितली नाही. तसेच त्यांनी यावर ताबडतोब व्यक्त व्हावे असेही नाही. पण आम्ही भूमिका मांडत आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
"राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते आहेत असं काल काहींनी जाहीर केलं, असं पत्रकारांनी संवादादरम्यान म्हटलं. यावर शरद पवार म्हणाले की, "ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे" असे शरद पवार म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली म्हणायचं कारण नाही : शरद पवार